कोल्हापूर : पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात कॉँग्रेससह डाव्या आघाड्यांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’च्या काळात केवळ खबरदारी म्हणून केएमटी बससेवा काही तासांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला, मात्र त्यामुळे आधीच तोट्यात असलेल्या केएमटीला अंदाजे चार लाखांचा फटका बसला. बसेस बंद ठेवल्यामुळे कोठेही अनुचित प्रकार घडला नाही.केएमटी बससेवा तोट्यात आहे, त्यातच बंदच्या काळात बंदकर्त्यांकडून होणारी दगडफेक आणि त्यामुळे होणारे नुकसान टाळण्याकरिता पोलिसांच्या विनंतीवरून शहरातील सर्वच मार्गावरील बससेवा सोमवारी काही तासांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला.
सकाळी काही बसेस डेपोतून बाहेर पडल्या. परंतु साडेनऊनंतर सर्वच बसेस पुन्हा डेपोकडे नेण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजेपर्यंत एकही बस रस्त्यावर फिरली नाही. दुपारी बससेवा पूर्ववत सुरू करण्यात आली.ऐन सणासुदीच्या काळात प्रवासी वर्गाची गर्दी असते. अशा वेळेत बससेवा सुमारे पाच ते सहा तास बंद ठेवल्यामुळे अंदाजे चार लाखांचे उत्पन्न बुडाले. केएमटीचे रोजचे उत्पन्न साधारणपणे आठ ते साडेआठ लाख रुपये आहे. त्यामुळे केएमटी आर्थिक संकटात आहे. त्यातच सोमवारी झालेले नुकसान हे भरून निघणारे नाही. बंदचा फटका केएमटीला बसला.