कोल्हापूर : ‘समाजाला काय पाहिजे याचे ज्ञान आत्मसात केलेल्या आणि लोकहिताचे काम करणाऱ्या राजषर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या नगरीतून काम करताना समाजाची गरज आणि तुमच्यातील सामर्थ्य ओळखून काम करा’, असा कानमंत्र सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी शनिवारी येथे एका समारंभात बोलताना दिला.उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. योगेश जाधव यांचा येथील केशवराव भोसले नाट्यगृहात सर्व पक्षीय नागरी सत्कार सोहळा राज्यपाल पाटील यांच्या हस्ते पार पडला, त्यावेळी ते मार्गदर्शन करीत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील होते.लोकांची नाडी ओळखता आली, आणि त्यांना काय पाहिजे हे जर समजलं आणि त्यास अनुसरुन काम करण्याचा आपण प्रयत्न केला तर ते काम लोकहिताचे तसेच कायमचे लक्षात राहिल. तुमच्या समोर राषर्षिंच्या कार्याचा आदर्श आहे.म्हणूनच तुमच्या कामातून सामान्य माणसांना आनंद होईल असे काम करा, असे आवाहनही पाटील यांनी केले.राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाला भरीव सहकार्य करतील. त्यासाठी विकास कामांचा प्राधान्यक्रम ठरवा. कोल्हापूर जिल्ह्यात रोजगार देणारे मोठे उद्योग आणण्यासाठी आपण सगळे प्रयत्न करु, अशी ग्वाही पालकमंत्री पाटील यांनी यावेळी दिली.शाहू छत्रपती, बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय पाटील यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. महापौर शोभा बोंद्रे यांनी सर्वांचे स्वागत करुन प्रास्ताविकात नागरी सत्कार आयोजनाचा हेतू स्पष्ट केला. गौरपत्राचे वाचन निनाद काळे यांनी केले. माजी महापौर आर.के.पोवार यांनी आभार मानले. यावेळी खासदार, आमदार यांच्यासह समाजातील सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.