कोल्हापूर : महानगरपालिकेच्या ‘स्वच्छ कोल्हापूर’ संकल्पने अंतर्गत क्रिडाई संस्थेने महानगरपालिकेस स्टेनलेस स्टीलच्या ८५ कचराकुंड्या भेट दिल्या. यावेळी आमदार सतेज पाटील, आयुक्त अभिजित चौधरी उपस्थित होते.‘स्वच्छ कोल्हापूर’ या संकल्पनेस आमदार सतेज पाटील व प्रतिमा पाटील यांनी मोठा हातभार लावला आहे. त्यांनी त्यांच्या फंडातून महापालिकेला कचरा कुंड्या भेट दिल्या होत्या.
त्यावेळी प्रतिमा पाटील यांनी ‘क्रिडाई’ संस्थेलाही कुंड्या भेट देण्याचे आवाहन केले होते. सामाजिक बांधीलकी म्हणून क्रिडाई तसेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वखर्चातून ८५ कुंड्या भेट देण्याचा निर्णय घेतला होता.कोल्हापुरातील अन्य असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनीही अशाप्रकारे कचराकुंड्या भेट देण्याचे आवाहन आमदार पाटील यांनी केले. आयुक्त चौधरी यांनी महापालिकेच्या उपक्रमास सहकार्य केल्याबद्दल पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.क्रिडाई कोल्हापूरचे सचिव के. पी. खोत यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्ष महेश यादव यांनी संस्था सामाजिक कार्यात हिरीरीने भाग घेत असल्याचे सांगितले. उपाध्यक्ष विद्यानंद बेडेकर यांनी आभार मानले.
कार्यक्रमास महापालिकेचे नगररचना विभागाचे सहायक संचालक धनंजय खोत, क्रिडाईचे खजिनदार सचिन ओसवाल, प्रकाश देवलापूरकर, रविकिशोर माने, संदीप मिरजकर, संचालक उत्तम फराकटे, चेतन वसा, संजय डोईजड, अजय कोराणे, मुकेश चुट्टाणी उपस्थित होते.