कोल्हापूर : संपूर्ण शहरवासीय दिवाळीची मौजमजा लुटत असताना आणि कार्यालयीन कर्मचारी, अधिकारी सुट्यांचा आनंद लुटत असताना कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील १९०० सफाई कामगार मात्र घरची दिवाळी बाजूला ठेऊन शहर स्वच्छ ठेवण्याच्या कामात व्यस्त राहिले.
दिवाळीच्या तीन दिवसांत तब्बल साडेसहाशे टन कचरा या कर्मचाऱ्यांनी उचलला आणि आपल्या कार्यतत्परतेची चुणूक दाखवून दिली. अद्यापही काही भागात कचरा साचला असून, पुढील दोन दिवसांत तो उचलला जाणार असल्याचे सांगण्यात आले.वर्षातील सर्वांत मोठा सण म्हणजे दिवाळी होय. या सणाच्या निमित्ताने बाजार पेठेत करोडो रुपयांची खरेदी होते. कपडे, फराळ, फटाके, प्रापंचिक वस्तू, इलेक्ट्रिक वस्तू याभोवती गुंडाळलेले कागद, प्लास्टिक पिशव्या,फोमिंग प्रत्येक घराघरांत येत असते.
दिवाळी सणाच्या निमित्ताने झालेल्या खरेदीमुळे कचरा निर्माण होण्याचे प्रमाण २0 ते ३0 टनाने वाढते. त्यातील वस्तू, कपडे वापरल्यानंतर त्यापासून निर्माण होणारा कचरा रस्त्यावर येतो. नागरिक हा सर्व कचरा शहरातील कोंडाळ्यात किंवा घंटा गाडीकडे देतात; त्यामुळे शहर स्वच्छ ठेवण्याच्या व्यवस्थेवर ताण पडतो.एकीकडे संपूर्ण शहर दिवाळीच्या आनंदात न्हाऊन गेले असताना आणि कार्यालयातील इतर कर्मचारी सुट्यांची मौजमजा लुटत असताना महापालिकेतील आरोग्य विभागातील सफाई कामगार मात्र सकाळी सहाच्या ठेक्यावर येऊन शहर स्वच्छ ठेवण्याच्या कामात व्यस्त होते.
दिवाळीत कचऱ्याचे प्रमाण वाढत असते; त्यामुळे कामगारांनाही जादा काम करावे लागत होते. रोज सरासरी २०० टन कचरा उचलला जातो; मात्र गेल्या तीन दिवसांत हे प्रमाण २२५ ते २३० टनांपर्यंत पोहोचले. तीन दिवसांत एकूण ६७५ ते ६९० टन कचरा उचलला गेला; त्यामुळे वाहनांच्या जादा फेऱ्या होत राहिल्या. अद्यापही काही कचरा ठिकठिकाणी पडला असून, तो उचलण्यास दोन दिवस लागतील, असे सांगण्यात आले.सफाई कामगारांना दिवाळी दिवशीच एक दिवसाची सुट्टी होती. लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज असे तीन दिवस या कामगारांना काम करावे लागले. सफाई कामगारांबरोबरच आरोग्य निरीक्षक, विभागीय आरोग्य निरीक्षक यांच्यासह स्वच्छता विभागाचे कार्यालयीन कर्मचारीही कामावर होते.