कोल्हापूर : डिझेल दरवाढ रद्द व्हावी, यासह अन्य न्याय्य मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा लॉरी आॅपरेटर्स असोसिएशनच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उजळाईवाडीजवळील मयूर पेट्रोल पंपालगतच्या राष्ट्रीय महामार्गावर सुमारे दीड तास वाहतूक रोखून धरत ‘चक्का जाम‘ आंदोलन केले. त्यामुळे काही काळ वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर दुपारी साडेबारानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.
दुपारी साडेबारानंतर या मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत झाली. आंदोलनकर्त्यांनी त्यानंतर आपला मोर्चा मार्केट यार्ड परिसरातील रेल्वे गुड्स यार्डकडे वळविला. त्या ठिकाणी धान्य उतरविण्यासाठी आलेल्या वाहनांना माल उतरवून झाल्यानंतर आपली वाहने रस्त्याकडेला लावण्याचे आवाहन केले; तर मार्केट यार्डमध्ये माल उतरविण्यासाठी आलेल्या वाहनचालकांना माल उतरविल्यानंतर वाहने रस्त्याकडेला लावण्याच्या सूचना दिला.दिवसभरात शाहूपुरी, मार्केट यार्ड, लक्ष्मीपुरी, एम.आय.डी.सी. गोकुळ शिरगाव, शिरोली, आदी परिसरातील ट्रान्स्पोर्ट कंपन्याही बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे नव्याने कोणीही वाहतूकदार मालाची भरणी अथवा उतरणी करीत नसल्याचे चित्र होते. अनेक ट्रकमालकांनी स्वत:हून आपले ट्रक शाहूपुरी, महामार्गालगत बाजूला लावले आहेत.
या आंदोलनाचे नेतृत्व असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष देसाई यांनी केले. यावेळी उपाध्यक्ष भाऊ घोगळे, सचिव हेमंत डिसले, प्रकाश केसरकर, विजय भोसले, शिवाजी चौगुले, जगदीश सोमय्या, विजय पोवार, राहुल कवडे, किरण निकम, राजू पाटील, शिवराज माने, विजय पाटील, विजय साळोखे, महादेव माने, विजय तेरदाळकर, आदी उपस्थित होते.
या देशव्यापी आंदोलनात कोल्हापुरातील १६ हजारांहून अधिक वाहतूकदार व ५०० हून अधिक ट्रान्स्पोर्टधारकही सहभागी झाले आहेत. मागण्या मान्य न झाल्यास शनिवारपासून आंदोलन तीव्र केले जाणार आहे, असेही जाधव यांनी स्पष्ट केले.