कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या खूनप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ विधीज्ञांची तातडीने नियुक्ती करावी, अशी लेखी मागणी पानसरे कुटुबियांच्यावतीने शुक्रवारी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. पुढील आठवड्यात ही सुनावणी असल्याने तातडीने नियुक्ती होण्याची गरज असल्याचे या कुटुंबियांनी निदर्शनास आणून दिले.पुरोगामी विचारवंत डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या खूनप्रकरणी त्यांच्या पत्नी श्रीमती उमादेवी कलबुर्गी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. कलबुर्गी यांच्या खूनप्रकरणांत तपासांत फारशी प्रगती नाही, असा त्यांचा मुख्य आक्षेप आहे. मागील सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालायाने दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी व गौरी लंकेश या विचारवंतांच्या खूनामध्ये अनेक साम्यस्थळे असल्याने या सर्व खूनांचा तपास सीबीआय सारख्या एकाच तपास यंत्रणेकडून का होऊ नये, असे मत व्यक्त केले होते व सीबीआयला आपले म्हणणे सादर करण्यास सांगितले होते.
पानसरे यांच्या खूनाचा तपास सुरुवातीपासून एसआयटी मार्फत सुरु आहे. लंकेश यांच्या खूनाचा तपास कर्नाटक एसआयटीमार्फत सुरु आहे. आता तपासाच्या या टप्प्यावर तपास यंत्रणा बदलल्यावर पुन्हा सगळा नवीन श्रीगणेशा होईल व त्यातून तपास कामावर परिणाम होईल असे मेघा पानसरे व लंकेश यांची बहिण कविता लंकेश यांचे म्हणणे आहे. म्हणून या खटल्यात महाराष्ट्र शासनातर्फे पानसरे खूनप्रकरणी ठामपणे बाजू मांडण्याची गरज आहे. त्यासाठी ज्येष्ठ विधीज्ञांची नियुक्ती होण्याची गरज आहे.
आता सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीची तारीख जवळ आल्याने ही नियुक्ती लगेच व्हावी, अशी पानसरे कुटुंबियांची अपेक्षा आहे. मेघा पानसरे यांनी कोल्हापूरचे अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे व एसआयटीच्या प्रमुखांनाही त्यासंबंधीचे पत्र पाठविले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनाही या पत्राची प्रत पाठवली आहे. मुख्यमंत्री या खटल्याचे गांभीर्य ओळखून सकारात्मक प्रतिसाद देतील, अशी आशा पानसरे कुटुंबियांना आहे.