कोल्हापूर : दोन दिवसांपूर्वी विधानपरिषदेच्या निवडणुका बिनविरोध करण्याच्या चर्चेला आज अखेर पुर्ण विराम मिळाला. अखेर कोल्हापूरची ही विधानपरिषदेची जागा बिनविरोध करण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे पालकमंत्री सतेज पाटील यांचा विजयी मार्ग मोकळा झाला आहे.दुपारच्या सुमारास भाजप नेते फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी धनंजय महाडिक यांना फोन करुन अर्ज माघार घेण्याची सुचना दिली. या सुचनेवरुन भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अमल महाडिक आणि शौमिका महाडिक यांना आपले अर्ज माघारी घेतले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना धनंजय महाडिक यांनी पक्ष आदेश पाळत आपण अर्ज माघार घेतल्याचे सांगितले.या निवडणुकीसाठी १० डिसेंबरला मतदान होणार होते. मात्र ही निवडणूक आता बिनविरोध होणार असल्याने पालकमंत्री सतेज पाटील यांचा विजयी मार्गे मोकळा झाला.भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हे दोघेही दिल्लीला गेल्याने राज्यातील विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होण्याच्या चर्चेला पुन्हा ऊत आला आहे. असा निर्णय जरी झाला तर मग कोल्हापूरची जागाही बिनविरोध होणार का, अशी विचारणा करण्यात येत होती. याला पुर्ण विराम मिळाला.
निवडणुकीचा बिगुल वाजल्यापासून कोल्हापुरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. पाटील आणि महाडिक यांच्याकडून विजयासाठी मतदारांच्या गोळाबेरीजेसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु होती. तर दुसरीकडे दोन्ही समर्थकांकडून सोशल वॉर सुरु होते. मात्र अखेर वरिष्ठ पातळीवरुन समझोता होताच कार्यकर्त्यांची हवाच निघून गेली.