कोल्हापूर : म्हाडा सदनिका धारकांना लागणारे ना हरकत दाखले सध्या पुणे कार्यालयातून मिळतात; त्यासाठी वेळ लागतो. हे दाखले कोल्हापूर कार्यालयातून मिळावेत व म्हाडांची खरेदी-विक्री दस्त नोंदणी पूर्ववत चालू व्हावी, अशी मागणी म्हाडा संघटनेचे माजी अध्यक्ष दिनकर कांबळे यांनी सोमवारी निवेदनाद्वारे केली; त्यासाठी आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.निवेदनात म्हटले आहे,‘कोल्हापूर शहरात म्हाडा अंतर्गत ३९ वसाहती व काही भूखंड विकसित केले असून, त्यामध्ये सुमारे पाच हजार कुटुंबांची व्यवस्था केली आहे. अनेक घरे हस्तांतर करण्यासाठी विशेष शिबिर घेऊन घरे नावावर केली. वैयक्तिक अभिहस्तांतरण करून सातबारा लोकांना मिळवून दिला.
आता अजून काही महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित आहेत. सदनिका धारकाची साईडची अतिरिक्त मोकळी जागा व गाळे धारकांचे नाव सातबारा उताऱ्यावर नोंद करून मिळावे, यासाठी सदनिकाधारक पाठपुरावा करत आहेत; त्यासाठी वसाहतीनिहाय बैठका घेऊन प्रश्न समजून घेतले जाणार आहेत. लवकरच शहरातील म्हाडा धारकांचा एकत्रित मेळावा आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत घेतला जाणार असल्याचे कांबळे यांनी म्हटले आहे.