कोल्हापूर : ‘मी लिंगायत, माझा धर्म लिंगायत’ असा नारा देत विविध मागण्यांसाठी लिंगायत समाजबांधवांनी महामोर्चाचा एल्गार पुकारला आहे. याअंतर्गत लातूर, सांगलीनंतर रविवारी कोल्हापूरमध्ये अखिल भारतीय लिंगायत समाजातर्फे महामोर्चा आयोजित केला आहे. यासाठी राज्यभरातून रविवारी पहाटेपासून लिंगायत समाजबांधव कोल्हापुरात दाखल होऊ लागले. दरम्यान, लिंगायत समाजाच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा करू, असे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर दिले.
लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माची मान्यता मिळावी, अल्पसंख्याकांचा दर्जा मिळावा या प्रमुख मागण्यांसह इतर विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय लिंगायत समाजातर्फेकोल्हापुरात रविवारी हा महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे. इतर समाजबांधवांनीही या मोर्चाला उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला आहे.
शाहू टोल नाका, तावडे हॉटेल, शिवाजी पूल, कळंबा, पुईखडी, फुलेवाडी या मार्गांवरून मोर्चासाठी वाहने कोल्हापूर शहरात येत होते. सकाळी अकरा वाजता समाजाच्या मागण्यांबाबत विविध मान्यवरांच्या भाषणांना सुरुवात झाली.
पालकमंत्र्यांनी स्वीकारले निवेदनसकाळी साडेदहा वाजता पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील दसरा चौकात आले. याठिकाणी त्यांनी लिंगायत महामोर्चाच्या समन्वयक सरलाताई पाटील यांच्या हस्ते मागण्यांचे निवेदन स्वीकारले. यावेळी पालकमंत्री पाटील यांनी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ घेऊन या मागण्यांबाबत समाजाच्या शिष्टमंडळासमवेत चर्चा करू असे आश्वासन दिले.
यावेळी आमदार अमल महाडिक, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख प्रा. संजय मंडलिक उपस्थित होते. यानंतर खासदार धनंजय महाडिक यांनीही भेट दिली.
मोठा पोलीस बंदोबस्तया मोर्चासाठी शहरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. दसरा चौकाकडे जाणारे मार्ग बॅरेकेटस् लावून बंद करण्यात आले होते. मोर्चासह शहरातील विविध मार्गांवर पोलीस तैनात करण्यात आले होते.