कोल्हापूर : शेतकऱ्यांचे एफआरपीप्रमाणे पैसे न दिलेल्या वारणा सहकारी साखर कारखान्याला ‘आरआरसी’च्या कारवाई अंतर्गत सात दिवसांत पैसे देण्याचे आदेश पन्हाळा तहसीलदारांनी शुक्रवारी बजावले. ‘भोगावती’ व ‘पंचगंगा’ कारखान्यांबाबत येत्या दोन दिवसांत नोटीस लागू होण्याची शक्यता आहे.साखर कारखान्यांचा हंगाम संपून दोन महिने उलटले तरी अद्याप शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे कारखान्यांनी पैसे दिलेले नाहीत. याबाबत आंदोलन अंकुश संघटनेने साखर आयुक्त कार्यालयाच्या दारात आंदोलन केले होते. त्याची दखल घेऊन साखर आयुक्तांनी कोल्हापूर जिल्ह्यातील ‘वारणा’, ‘भोगावती’ व ‘पंचगंगा’ या कारखान्यांवर आरआरसीची कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते.
त्यानुसार अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित तालुक्यांतील तहसीलदारांना याबाबतची कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या होत्या. पन्हाळा तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ‘वारणा’ कारखान्याला नोटीस बजावली असून येत्या सात दिवसांत कारखान्याने शेतकऱ्यांची प्रलंबित एफआरपीची रक्कम द्यावी, अन्यथा साखर जप्तीची कारवाई करावी लागेल, असा इशारा दिला आहे.
‘भोगावती’बाबत करवीर तहसीलदारांना तर ‘पंचगंगा’बाबत हातकणंगले तहसीलदारांना अद्याप जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश पोहोचले नसल्याचे समजते. आदेश प्राप्त होताच संबंधितांवर कार्यवाही सुरू केली जाईल, साधारणत: येत्या दोन दिवसांत संबंधितांना नोटिसा बजावल्या जातील, असे तहसीलदारांनी ‘अंकुश’ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले आहे.
सध्या शेतकरी कमालीचा संकटात सापडला असताना कारखानदार मात्र निवांत आहेत. येत्या आठ दिवसांत शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही तर पुन्हा साखर आयुक्तांच्या दारात ठिय्या मारला जाईल.-धनाजी चुडमुंगे, संस्थापक, आंदोलन अंकुश