कोल्हापूर : ‘एक होती चिऊ अन् एक होता काऊ. चिमणीचं घर मेणाचं, काऊचं घर शेणाचं.’ ही गोष्ट ऐकत आपण मोठे झालो; पण शहरीकरणामुळे गेल्या काही वर्षांत चिऊताई शहरांमध्ये दिसेनाशी झाली आहे. लहानग्या बाळाला घास भरवताना ‘एक घास चिऊचा’ असे दाखवलायही चिमणी शिल्लक राहिलेली नाही. आपल्या घरात, अंगणात पुन्हा चिमण्यांचा चिवचिवाट ऐकण्यासाठी ‘चला चिमणी वाचवू या...’‘नेचर फॉरेव्हर सोसायटी’ या संस्थेच्या पुढाकाराने सन २०१०पासून २० मार्च हा ‘जागतिक चिमणी दिन’ म्हणून साजरा केला जातो. पहिल्याच वर्षी जगभरातून या मोहिमेला प्रतिसाद मिळाला. गेल्या काही वर्षांत या उपक्रमाने मोठी जनजागृती झाली आहे. पूर्वीच्या काळी शहरासह ग्रामीण भागात मातीची घरे होती. मात्र, बदलत्या काळानुसार मातीची घरे जावून झाल्याने सिमेंट कॉंक्रिटची जंगले उभी राहिली.
झाडे तोडली गेली आणि चिमण्यांना घरटी बांधायला जागाच उरली नाही. याचा परिणाम म्हणून चिमण्यांची संख्या हळू-हळू कमी झाली. मोबाईलच्या ध्वनिलहरींमुळेही चिमण्यांवर दुष्परिणाम होत असल्याचे काही संशोधनामधून समोर आले असून ध्वनिलहरीच्या प्रकोपाने अंडी न उबवताच खराब होतात किंवा पिल्लू निघालेच तर लहरींच्या प्रकोपाने उडण्यापूर्वीच मरून जाते, हेही चिमण्यांची संख्या कमी होण्याचे महत्त्वाचे कारण आहेच.ग्रामीण भागात, शेतीच्या प्रदेशात अगदी शहर सोडून थोडं बाहेर गेलं तरी आजही चिमण्या दिसतात, अगदी भरपूर नाही; पण दिसतात मात्र नक्की. कलासाधना मंचचे विजय टिपुगडे हे गेल्या काही वर्षांपासून ‘चला चिमण्या वाचवूया’ प्रदर्शनाद्वारे जनजागृती करत आहेत. पहाटे उठल्या-उठल्या मन प्रसन्न करणारा चिमणीचा चिवचिवाट ऐकू यावा, चिमण्यांनी अंगणात बागडावे यासाठी त्यांना निवारा आणि खाद्य उपलब्ध करून देऊया..
हे करता येईल...१) चिमणीसाठी तयार घरटे लावू शकता.२) दारात, फ्लॅट, घराच्या टेरेसवर, खिडकीत चिमण्यांसाठी धान्य, चपातीचे तुकडे आणि पिण्यासाठी पाणी ठेवा.३) चिमण्यांना पाण्यात खेळायला खूप आवडते. त्यामुळे मातीचे मोठे भांडी, घरातले खराब भांड्यामध्येही पाणी ठेवू शकता.४) रिकामी खोकी किंवा तत्सम वस्तू चिमण्या आत जाईल, असे भोक पाडून, घराबाहेर खिडकीच्यावर उंच जागेवर टांगता येईल.