कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या आवारात ‘नो पार्किंग’ची अंमलबजावणी सुरू असल्याने या ठिकाणी स्वच्छता आणि शांतता राहण्यास मदत होत आहे. त्यामुळे या आवारात पार्किंगसाठी परवानगी देणे किंवा गाड्या बाहेर सोडण्यासाठी चालक देणे शक्य नसल्याचे पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी जिल्हा परिषद सदस्या सरिता शशिकांत खोत यांना पाठविले आहे.माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत यांनी शुक्रवारी (दि. १३) आपली गाडी जिल्हा परिषदेच्या आवारात लावली होती. यावेळी अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी या गाडीची हवा सोडण्याच्या सूचना दिल्याने मोठी वादावादी झाली होती. त्यावेळी खोत यांनी आपल्या पत्नी सदस्या असून त्यांनी जानेवारीतच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना याबाबत पत्र दिल्याचे सांगितले होते.या पत्राला या प्रकारानंतर तातडीने उत्तर देण्यात आले असून यामध्ये पार्किंगसाठी परवानगी देणे शक्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दि. २४ जानेवारी २०१८ रोजी सरिता खोत यांनी याबाबत पत्र दिले होते. मात्र, त्याला उत्तर देण्यात आले नव्हते.
शुक्रवारी या घटनेनंतर मंगळवारी याबाबत सदस्या खोत यांना पत्र पाठविण्यात आले आहे. खोत यांनी जिल्हा परिषद आवारात सदस्यांना गाडी पार्किंगसाठी परवानगी मिळावी किंवा गाडी बाहेर सोडण्यासाठी चालक मिळावा, अशी मागणी केली होती.परंतु शिस्तीचा भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला असून त्याला सर्वांनीच सहकार्य करणे गरजेचे आहे, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आवारात गाड्या न लावण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
खोत जिल्हा परिषदेकडे फिरकलेच नाहीतशशिकांत खोत यांनी सोमवारी डॉ. खेमनार यांनी याबाबत बैठक घेण्याचे आश्वासन देऊनही ती न घेतल्याने आपण मंगळवारी गाडी घेऊन येणार असून जिल्हा परिषदेसमोरच पार्किंग करणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे मंगळवारी आणि या ठिकाणी वाद होण्याची शक्यता होती. मात्र, खोत हे मंगळवारी जिल्हा परिषदेकडे आले नाहीत..