कोल्हापूर : महानगरपालिकेच्या परवाना विभागात शुक्रवारी मध्यरात्रीनंतर चोरी होऊन कार्यालयातील फाईल्सचे अनेक गठ्ठे, रजिस्टर गायब झाली आहेत. कोणत्याही स्वरुपाची रोख रक्कम अथवा अन्य मौल्यवान वस्तू कार्यालयात नसताना चोरट्यांनी केवळ फाईल्सचे गठ्ठे, रजिस्टर चोरुन नेल्यामुळे या चोरीचे गुढ वाढले आहे.
शिवाजी मार्केटमधील ज्या माळ्यावर कोल्हापूर महानगरपालिकेच्या परवाना विभागाचे कार्यालय आहे, त्याच्या बाहेरील बाजूला सीसीटीव्ही बसविण्यात आल्याने त्याच्या आधारे पोलिसांना चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान आहे. मनपाच्या शिवाजी मार्केटमधील दुकान गाळ्यात परवाना विभागाचे कार्यालय आहे. अन्य विविध प्रकारच्या दुकानगाळ्यांच्या सोबत मनपाचे एकच कार्यालय आणि तेही एका बाजूला आहे. तेथे भाजी मार्केटही असल्याने दिवसभर येथे मोठी गर्दी असते.
गुरुवारी सायंकाळी परवाना विभागाचे कार्यालय बंद करुन कर्मचारी निघून गेले. शुक्रवारी मनपा वर्धापन दिनाची सुट्टी जाहीर झाल्याने कोणी कर्मचारी कार्यालयात गेले नाहीत. शनिवारी मात्र या कार्यालयातील कर्मचारी कामावर आले, तेव्हा कार्यालयाला लागून असलेल्या खोलीचे कुलुप तोडण्यात आल्याचे तसेच आतील फाईल्सचे अनेक गठ्ठे ,रजिस्टर गायब होऊन कपाटे रिकामी झाल्याचे निदर्शनास आले.
चोरट्यांनी कापडात बांधून ठेवलेले गठ्ठे सोडून त्याचे कापड त्यांनी वेगवेगळ्या दोन तीन ठिकाणी फेकून दिल्याचे आढळले. तसेच खोलीतही अनेक फाईल, कागदपत्रे विस्कटलेली दिसून आली. गठ्ठे, रजिस्टर ठेवलेली कपाटे रिकामी झाली आहेत. चोरट्यांनी नेमके गठ्ठे उचलून नेले आहेत. फाईल चाळण्याचा प्रयत्नही त्यांच्याकडून झाल्याचे दिसते. चोरट्यांनी जाताना खोलीचे शटर बंद करुन ठेवले, पण कुलुप गायब केले आहे.
चोरी झाल्याचे लक्षात येताच परवाना अधीक्षक सचिन जाधव यांनी तातडीने अतिरीक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांना ही माहिती दिली. त्यांच्या सल्लयानुसार जाधव यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात जाऊन रितसर चोरीची वर्दी दिली.
लक्ष्मीपुरीचे पोलिस घटनास्थळी जाऊन पाहणी करुन गेले. जेथे चोरी झाली आहे, त्याच्या बाहेरील बाजूस काही दुकानदारांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. त्यातील फुटेज पाहिल्यानंतर चोरीचा छडा लागण्याची शक्यता आहे.महत्वाचे रेकॉर्ड गायबगेल्या अनेक वर्षापासून शहरात देण्यात आलेले व्यवसायाचे परवाने यासंबंधीचे रेकार्ड शिवाजी मार्केटमधील कार्यालयात ठेवण्यात आले होते. रेकार्ड ठेवण्यासाठी स्वतंत्र खोलीच असून या ठिकाणी बरेच गठ्ठे, रजिस्टर्स कापडात गुंडाळून ठेवण्यात आले होते.
कार्यालयात रोख रक्कम नसते. अन्य मौल्यवान वस्तूही नाहीत. फाईल्सचे गठ्ठे नेल्याने रद्दी विकूनही चोरट्यांना फारसे पैसे मिळणार नाहीत. तरीही चोरी झाली झाली आहे. त्यामुळे चोरीचा हेतू रेकॉर्ड नष्ट करणे असा असू शकतो, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.