कोल्हापूर : आपटेनगर येथील कट्ट्यावर बसलेल्या वृद्धाला पोलीस असल्याची बतावणी करून त्याची सव्वादोन तोळ्यांची सोन्याची चेन भामट्याने हातोहात लंपास केली. पोलिसांच्या नावाखाली लूटमारीच्या घटना घडू लागल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.अधिक माहिती अशी, शिवाजी दत्तात्रय साठे (वय ६७, रा. राध्येनगरी, आपटेनगर) हे रविवारी (दि. ४) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास फिरण्यासाठी घराबाहेर पडले. फिरून आल्यानंतर आपटेनगर येथील कट्ट्यावर बसले असताना त्यांच्यासमोर दुचाकीवरून एकजण आला.
मी पोलीस आहे, गळ्यात सोने घालून बसू नका. लूटमारीच्या घडना घडू लागल्या आहेत, अशी बतावणी करून त्यांना चेन काढण्यास भाग पाडले. त्यानंतर ती रुमालात बांधून देतो असे सांगून त्याने चेन घेऊन पोबारा केला.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच साठे यांनी सोमवारी (दि. ५) जुना राजवाडा पोलिसांत फिर्याद दिली. त्याच दिवशी रुईकर कॉलनी येथील मैदानावर फिरायला आलेल्या शिवाजी महादेव लायकर (६४, रा. एल. आय. सी. कॉलनी, रुईकर कॉलनी परिसर) यांनाही पोलीस असल्याचे सांगून त्यांच्या अंगावरील साडेतीन लाखांचे दागिने लंपास केले होते.
गेल्या महिन्याभरात पोलीस असल्याची बतावणी करून शहरभर वृद्ध महिला व पुरुषांना लुटले जात आहे. डझनभर घटना घडूनही पोलिसांनी कोणतीच दक्षता घेतली नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.