कोल्हापूर : ‘शरद पवार भटकता आत्मा असेल तर नरेंद्र मोदी म्हणजे सत्तेसाठी वखवखलेला आत्मा आहे, तो सुद्धा महाराष्ट्रात फिरतोय’, अशा परखड शब्दात शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी बुधवारी रात्री गांधी मैदानावर झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला.
पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या प्रचार सभेतील वक्तव्याचा त्यांनी ठाकरी भाषेत समाचार घेतला. कोल्हापूर मतदार संघातील महाआघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ आयोजित शिव -शाहू निर्धार सभेत ते बोलत होते.
भाषणाच्या प्रारंभीच ठाकरे यांनी, हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, फुले - शाहू - आंबेडकरांचा आहे की शहा - मोदी - अदानींचा आहे? तोच शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र टिकवणार की शहा - मोदी - अदानींच्या हातात देणार्? असे सवाल उपस्थितांना विचारत सभेत चैतन्य निर्माण केले.
महाराष्ट्र दिनी हुतात्म्यांना अभिवादन करताना मी एक शपथ घेतली आहे. ज्या हुतात्म्यांनी रक्त सांडून, बलिदान देऊन मुंबईसह महाराष्ट्र मिळविला आहे तो महाराष्ट्र मी महाराष्ट्र द्रोह्यांच्या हाती जाऊ देणार नाही. जे महाराष्ट्र लुटताहेत, ओरबडताहेत, महाराष्ट्राच्या मुळावर उठलेत त्यांचा सुफडासाफ केल्याशिवाय थांबणार नाही. महाराष्ट्र बद्दलचा हा आकस आजचा नाही. शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती, त्याच सुरतचे दोघे जण आज महाराष्ट्र लुटू पहात आहेत. अशा वेळी डोळ्याला झापड लावून बघत बसायचे का? असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला.
शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष त्यांना संपवायचा आहे. त्यांना वाटतंय हे दोन पक्ष संपले की महाराष्ट्र आपल्या बापाचा झाला. पण असे अजिबात होणार नाही, असे सांगत ठाकरे म्हणाले, गुजरात मध्ये भुकंप झाला तेंव्हा शरद पवार हे पक्षाचा, राज्याच्या सीमेचा विचार न करता गुजरातच्या मदतीला धावून गेले. तत्कालिन प्रधानमंत्री अटल बिहारी बाजपेयी यांनी पवारांची कौतुक केले. त्यांना राष्ट्रीय आपत्ती विभागाचे प्रमुख केले. पवार, बाजपेयींकडे हा दिलदारपणा होता आणि तुम्ही आज पवारांची अवहेलना भटकता आत्मा म्हणून करता?
दैवताच्या वाट्याला जाऊ नका मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर केली गेली. त्यांची अशी तुलना होऊ शकत नाही. काय मोदींचा उदो ..उदो करायचा तो तुमच्या घरी करा. जर अशी तुलना केली तर महाराष्ट्र सहन करणार नाही, अशा शब्दात ठाकरे यांनी इशारा दिला.
हे तुमचे अपयशतुम्हाला राजकारणात नेते म्हणून मुलं होत नाहीत याला आम्ही काय करु.आमच्यातील गद्दारांना चोरुन उभे करायला लागतात हे तुमचे अपयश आहे. तुम्ही म्हणजे मुलं पळविणारी टोळी आहे. गद्दारांना चोरले असाल पण महाराष्ट्रातील करोडो लोक आज खांद्याला खांदा लावून आमच्या सोबत आहेत.