LokSabha Result2024: कोल्हापूरकरांचं 'मत' अन् 'मान'ही गादीलाच, दीड लाखांवर मताधिक्याने शाहू छत्रपती विजयी
By समीर देशपांडे | Published: June 4, 2024 06:20 PM2024-06-04T18:20:51+5:302024-06-04T18:21:43+5:30
करवीर, राधानगरीमुळे लागला महाराजांना गुलाल
कोल्हापूर: संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपती यांनी दीड लाखांवर मताधिक्य घेत बाजी मारली. ७१ हजारावर करवीर विधानसभा तर ६५ हजारहून अधिक राधानगरी विधानसभा मतदारसंघाने दिलेले मताधिक्यच छत्रपतींना गुलाल लावणारे ठरले.
याउलट महायुतीचा ज्या विधानसभा मतदारसंघांवर भरोसा होता त्या पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल मतदारसंघात केवळ १४ हजारांचे मताधिक्य मिळाले असून चंदगड मतदारसंघातून तर छत्रपतीच ९ हजारावर मतांनी आघाडीवर राहिले. त्यामुळे ज्या दोन मतदारसंघांवर महायुतीची मदार होती त्याच ठिकाणी महायुतीला रोखण्यात आघाडीला यश आले आणि शाहू छत्रपती खासदार झाले. मतमोजणी अंतिम टप्प्यात असून अंतिम आकडेवारी आलेली नाही. परंतू या मताधिक्यात आता बदल होणार नाही अशीच परिस्थिती आहे.
सुरूवातीपासूनच शाहू छत्रपती यांनी प्रत्येक फेरीत जे मताधिक्य घेण्यास सुरूवात केली ते अखेरपर्यंत वाढत गेले. सहाही विधानसभा मतदारसंघाच्या एकत्रित एकाही फेरीत मंडलिक हे मताधिक्य घेवू शकले नाहीत. उलट प्रत्येक फेरीगणिक छत्रपती यांचे मताधिक्य वाढतच गेले. आमदार सतेज पाटील, दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मनापासून केलेला प्रचार, राजघराण्याने तोडीस तोड केलेली राबणूक आणि मोठ्या महाराजांबद्दल असणारा आदर यामुळे नरेंद्र मोदी यांच्या सभा होवूनही आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले आठ मुक्कामही मंडलिक यांना पराभवापासून वाचवू शकले नाहीत.
दुसरीकडे पालकमंत्री हसन मुश्रीफ, मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक यांच्यासह दोन आमदार आणि सत्तारूढ म्हणून असणारी ताकदही मंडलिक यांना विजयी करू शकली नाही. ज्या कागल आणि चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या जोरावर मंडलिक निवडून येणार असल्याच्या वल्गना झाल्या याच ठिकाणी महायुतीची गाडी पंक्चर झाल्याचे स्पष्ट झाले. शाहू छत्रपती यांच्या विजयाने न्यू पॅलेस परिसर गुलालाने न्हाऊन निघाला असून शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली आहे. शाहू छत्रपती यांच्या अभिनंदनाचे फलक सोमवारी दुपारपासूनच मतदारसंघात उभारण्यात आले होते.