कोल्हापूर : जिल्हाधिकारी कार्यालयातील स्वच्छतागृहातील अस्वच्छतेबाबत ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशनमधून गुरुवारी पंचनामा केला होता. त्याच्या दणक्याने जिल्हा प्रशासनाने कर्मचाऱ्यांमार्फत शुक्रवारी स्वच्छता केली; परंतु ती वरवरच होती. कारण तुंबलेल्या घाण पाण्याचा निचरा न होणे हे दुखणे अजून कायम आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सवडीवरच त्यावर इलाज होणार असल्याचे दिसत आहे.इमारत चकाचक; पण स्वच्छतागृह कायम तुंबल्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी झाली आहे. यामुळे रोगराई पसरते की काय, अशी भीती येथील कर्मचाऱ्यांसह कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. हे वास्तव गुरुवारी ‘लोकमत’ने समोर आणले.
यानंतर खडबडून जागे झालेल्या जिल्हा प्रशासनाने कर्मचाऱ्यांमार्फत स्वच्छतागृहात औषध फवारणी करून स्वच्छता केली; परंतु तुंबलेले दुर्गंधीयुक्त पाणी तसेच राहिले. सार्वजनिक बांधकाम विभागाकडूनच हे काम होणार आहे; परंतु त्यांना सवड नसल्याने आणखी किती दिवस हे पाणी येथे साचणार, हा प्रश्न आहे.स्वच्छतागृहातील स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून करून घेण्यात आली आहे. तसेच घाण पाणी वाहून नेणारी वाहिनी ब्लॉक झाल्याने त्यातील पाण्याचा निचरा होऊ शकलेला नाही. या तांत्रिक अडचणीचे निराकरण करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला कळविले आहे. तसेच महापालिकेच्या आरोग्य विभागाशीही संपर्क केला असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी सांगितले.