कोल्हापूर : लोकमत समूहातर्फे ६ जानेवारीला होणाऱ्या दुसऱ्या पर्वातील महामॅरेथॉन स्पर्धेसाठी सर्वसामान्य आबालवृद्धांसह व्यावसायिक धावपटू, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू, उद्योजक, व्यापारी, सरकारी अधिकारी, नेतेमंडळी, सहकारी संस्थांतील पदाधिकारी, कर्मचारी, खासगी उद्योगसमूहाचे संचालक, कर्मचारी, आदींच्या प्रत्यक्ष नोंदणीसह सहभागामुळे भरघोस प्रतिसाद लाभत आहे.‘व्हिंटोजिनो’ प्रस्तुत लोकमत महामॅरेथॉन पॉवर्ड बाय ‘माणिकचंद आॅक्सिरिच’च्या दुसऱ्या पर्वातील कोल्हापूर महामॅरेथॉन ६ जानेवारीला पोलीस परेड मैदान, कसबा बावडा येथे होणार आहे. मागील वर्षी पहिल्या पर्वातील यशस्वी नियोजनानंतर यंदाही स्पर्धेचे द्वितीय चरण होत आहे. या दुसऱ्या पर्वातील रनसाठी आख्खी कोल्हापूरनगरी सज्ज झाली आहे.
प्रत्येकाच्या तोंडी ‘लोकमत महामॅरेथान’चीच चर्चा सुरू आहे. विशेषत: शाळा, कॉलेज आणि विविध तालीम संस्था, मंडळे, उद्योजक, व्यापारी, सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये या स्पर्धेत धावण्याची तयारी सुरू आहे; त्यामुळे ६ जानेवारी कधी एकदा उजडतो आणि मी स्पर्धेत धावेन, अशी उत्सुकता लागून राहिली आहे. नोंदणीसाठी अवघे काहीच दिवस उरले असल्याने अनेकांनी शहर कार्यालयासह जिल्ह्यातील विविध ठिकाणांच्या नोंदणी केंद्रांवर सकाळपासूनच सहभाग नोंदणीसाठी अक्षरश: रीघ लावली होती. यात विशेषत: युवावर्ग, ज्येष्ठ धावपटू, महिलांचा सहभाग अधिक होता.
सामाजिक कार्यासह ‘पीएमएस’ गु्रपचा स्पर्धेतही सहभाग‘पीएमएस’ गु्रपचे एमडी व यंग जैन्स आॅफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रौनक शहा-संघवी यांच्या मार्गदर्शनाखाली या गु्रपचे हर्षित ओसवाल, शेखर नागटिळे, विजय सांगावकर, नीलेश ओसवाल, आदी सहा जानेवारीला होणाऱ्या ‘लोकमत महामॅरेथॉन’मध्ये सहभागी होणार आहेत.
नुसता सहभाग न नोंदवता स्पर्धेनंतर आपली सामाजिक जबाबदारी म्हणून स्पर्धेनंतर झालेला कचरा साफ करून स्वच्छता मोहीमही राबविणार आहेत. ‘आओ पढे, आगे बढे’ हा संदेश घेऊनही ही संस्था यंग जैन्स आॅफ इंडियाच्या मार्गदर्शनाखाली काम करीत आहे. याच माध्यमातून या संस्थेने व स्वत: शहा यांनी गरजंूना शैक्षणिक, सामाजिक जबाबदारी म्हणून आर्थिक मदतीसह, साहित्य दिले आहे.
विशेषत: कणेरीची अनाथ मुलांची शाळाही मीना पोपटलाल शहा-संघवी या नावाने दत्तक घेतली आहे. या शाळेतील विद्यार्थांची वर्षभराची जबाबदारीही त्यांनी घेतली आहे. प्लास्टिक मुक्तीसाठीही या संस्थेने पन्हाळा तालुक्यात राज्यातील पहिला प्रयोग केला. यात १५०० कापडी पिशव्याही संपूर्ण तालुक्यात वाटल्या.
आगळीवेगळी वृक्षसंगोपन स्पर्धाही लक्षतीर्थ येथे घेतली होती. यात एक वृक्ष लावल्यानंतर सहा महिन्यांत त्या वृक्षाची चांगली निगा राखणारा विजेताही घोषित केला. शहरासह जिल्ह्यात ज्यांना पाणपोई पाहिजे, त्यांना ती पुरविण्याचे कामही ही संस्था गेल्या काही वर्षांपासून करीत आहे.
कोल्हापुरातील ‘पीएमएस’ गु्रपचे कर्मचाऱ्यांसह स्वत: एमडी रौनक शहा, हर्षित ओसवाल, शेखर नागटिळे, विजय सांगावकर, नीलेश ओसवाल ‘लोकमत महामॅरेथॉन’च्या दुसऱ्या पर्वात सहभागी होऊन धावणार आहेत.
तंदुरुस्त राहण्यासाठी रोज धावा!रोजच्या जीवनात काम करीत असताना, व्यक्तीने रोज फिरले पाहिजे, चालले किंवा धावले पाहिजे. आजच्या युगात आरोग्य चांगले, तर सर्वकाही आपण साध्य करू शकतो. त्यासाठी कुटुंबातील लहान, तरुण, वृद्ध, आदी सर्वांनी शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी रोज पहाटे धावले पाहिजे, व्यायाम केला पाहिजे. त्यासाठी आळस करून चालणार नाही. ‘लोकमत’ने आपणा सर्वांना या निमित्ताने धावण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. मी व माझे कुटुंबीय या ‘महामॅरेथॉन’मध्ये सहभागी होत आहोत. तुम्हीदेखील सहभागी व्हा.- सतीश माने गृह पोलीस उपअधीक्षक
मास्टर्स धावपटू आकाराम शिंदेही वयाच्या ८० व्या वर्षी धावणारकुणाला गाणी ऐकण्याचा, तर कुणाला पुस्तके वाचण्याचा छंद असतो. मात्र, वयाची ८० गाठलेले माजी सैनिक आकाराम शिंदे यांना धावण्याचा छंद आहे. नेफा, चायना येथे १९६२ च्या व १९६५ च्या कारगील, लेह-लडाख या युद्धात एक सैनिक म्हणून कामगिरी करणारे आकाराम शिंदे यांना लष्करात असल्यापासून धावण्याचा छंद लागला आणि हाच छंद आजही जपत त्यांनी २०१३ ला झालेल्या आंतरराष्ट्रीय मास्टर्स अॅथलेटिक्स स्पर्धेत सहभागी होत, त्यांनी ५००० मीटरमध्ये एक रौप्य व १५०० मीटरमध्ये एका कांस्यपदकाची कमाई केली. त्यानंतर २०१४ साली मलेशिया येथे झालेल्या वर्ल्ड मास्टर्स अॅथलेटिक्स स्पर्धेतही त्यांनी दोन कांस्यपदकांची कमाई केली.
२१ मे २०१७ ला पुन्हा मलेशिया येथे झालेल्या साबलिकास स्टेडियमवरील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ५००० मीटर चालणे, १५०० व ८०० मीटर धावणे, आदी प्रकारांत आठ पदकांची कमाई केली. ९ ते ११ मार्च २०१८ रोजी लम्पाँग (थायलंड) येथे झालेल्या मास्टर्स अॅथलेटिक्स स्पर्धेत सहभाग घेतला होता. यासह भारतातील अनेक मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवून पदकांची कमाई केली आहे.
यात मुंबई, वसई, विरार, गोवा, नाशिक, ठाणे, पुणे, सातारा, चंदीगढ, जम्मू-काश्मीर, आदी स्पर्धांमध्येही सहभागी होत ३५ हून अधिक पदकांची कमाई केली आहे. गेल्या वर्षीपासून कोल्हापुरात होणाºया ‘लोकमत महामॅरेथॉन’मध्येही त्यांनी सहभाग घेत स्पर्धा पूर्ण केली होती. यंदाही ते या स्पर्धेत सहभागी होत आहेत. ही स्पर्धा म्हणजे आनंद देणारी महामॅरेथॉन आहे, असेही त्यांनी सहभाग नोंदविताना स्पष्ट केले.
दहा किलोमीटरची रन पूर्ण करणार दिव्यांग ‘संतोष ’राक्षी (ता. पन्हाळा) येथील दिव्यांग धावपटू संतोष रांजगणे हा ६ जानेवारीला होणाºया महामॅरेथॉनमध्ये नियमित १० किलोमीटर रनमध्ये धावणार आहे. तो व्हीलचेअर घेऊन ही रन पूर्ण करणार आहे. त्याने यापूर्वी चेन्नई येथे कोटकतर्फे २१ कि.मी. व्हीलचेअर मॅरेथॉनमध्ये २ तास १३ मिनिटे, तर बेळगाव येथील मॅरेथॉन ५ कि.मी. ३६ मिनिटांत, आधार पुनावाला क्लीन सिटी मॅरेथॉनमध्ये ५ कि.मी. अंतर ३१ मिनिटांत पूर्ण करीत प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
यासह पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉनमध्येही सहावा क्रमांक पटकाविला. यासह तो महाराष्ट्र राज्य दिव्यांग क्रिकेट टीममध्ये क्रिकेटपटू म्हणूनही सहभागी होत आहे. यातही त्याने उत्तराखंड येथे झालेल्या आयडब्ल्यूपीएल स्पर्धेतही राज्य संघाचे विजेतेपद पटकाविले. त्यातही संतोषने चांगली कामगिरी केली.
आंतरराष्ट्रीय कराटेपटू ‘राजीव’ही सहभागीयेथील शांतिनिकेतन स्कूलचा विद्यार्थी असलेला आंतरराष्ट्रीय कराटेपटू राजीव अनिल करोशी हाही महामॅरेथॉनच्या १० कि.मी. रनमध्ये सहभागी होणार आहे. त्याने यापूर्वी शिमोगा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय पीपल्स आॅलिम्पिकमध्ये एक सुवर्ण, तर सकाई नॅशनलमध्ये सुवर्ण, आदी ठिकाणी झालेल्या विविध कराटे स्पर्धेत यश मिळविले आहे. त्याची नुकतीच श्रीलंका व नेपाळ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
कोल्हापुरातील गगनभरारी स्पोर्टस अकॅडमीच्या धावपटूंसह प्रशिक्षकांनी ‘लोकमत महामॅरेथॉन’मध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
नावनोंदणीसाठी संपर्कया महामॅरेथॉनमधील विजेत्यांना एकूण सहा लाखांची बक्षिसे दिली जाणार आहेत. महामॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी ६वेबसाईटसह लोकमत शहर कार्यालय, कोंडा ओळ, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर, मोबाईल नंबर (रोहन भोसले) ९६०४६४४४९४, ९८८१८६७६०० वर नोंदणी करता येणार आहे.
सहा लाखांची बक्षिसेया वर्षातील महामॅरेथॉनला नाशिक येथून सुरुवात झाली आहे. त्यात नाशिककरांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होत प्रचंड प्रतिसाद दिला. त्यानंतर १६ डिसेंबरला औरंगाबाद येथे महामॅरेथॉन उदंड प्रतिसादात पार पडली. आता कोल्हापुरात ६ जानेवारीला तिसरी महामॅरेथॉन होणार आहे. त्यानंतर नागपूर येथे ३ फेबु्रवारी आणि १७ फेबु्रवारी २०१९ ला पुणे येथे महामॅरेथॉन होत आहे.
कोल्हापुरात होणारी ही महामॅरेथॉन २१ कि.मी. हाफ मॅरेथॉन, १० कि.मी. पॉवर रन, ५ किलोमीटर फन, तर ३ किलोमीटर फॅमिली रन होणार आहे. त्यातील विजेत्यांना पदक आणि सहा लाख रोख रकमेच्या स्वरूपातील बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे.