कोल्हापूर : कोल्हापूर सकाळी दाट धुक्यात हरविले होते. विशेष म्हणजे सकाळी दहापर्यंत धुक्याची चादर संपूर्ण जिल्ह्यावर पसरली होती. काही दिवसांपूर्वीच्या कडाक्याच्या थंडीतही एवढ्या वेळपर्यंत धुके राहिले नव्हते. हवामानात एकदम बदल झाल्याने जनजीवन काहीसे विस्कळीत झाले.यंदा आॅक्टोबरपासून कमी-अधिक का असेना; पण थंडीचा कडाका राहिला. जानेवारी संपत आल्याने आता हळूहळू थंडी गायब होऊन तापमानात वाढ होत जाणार आहे. त्यानुसार गेल्या आठ दिवसांत थंडीचा कडाका काहीसा कमी झाला होता; पण पहाट झाली ती दाट धुक्यानेच. घराबाहेर पडल्यानंतर फुटाच्या अंतरावरील काही दिसत नव्हते, इतकी धुक्याची तीव्रता होती. त्यात दवही मोठ्या प्रमाणात पडत होते. थंडी नव्हती; पण दवामुळे सारे अंग भिजून गेल्याने हुडहुडी जाणवत होती.या वातावरणाचा ऊसतोड मजुरांना सर्वाधिक त्रास झाला. धुके आणि दवामुळे उसाची तोड करताना कसरत करावी लागत होती. एरव्ही साडेसातपर्यंत धुके राहायचे आणि त्यानंतर हळूहळू धुक्याचे पांघरूण जाऊन सूर्यनारायणाचे दर्शन व्हायचे. मात्र सकाळी दहापर्यंत धुके राहिल्याने जनजीवनावर त्याचा परिणाम झाला.
वाहनधारकांना हेडलाईट लावल्याशिवाय समोरचे काही दिसत नव्हते. दिवसभर ऊन राहिले असले तरी त्याची तीव्रता जाणवत नव्हती. सकाळी किमान १७, तर कमाल २९ डिग्री तापमान राहिले. आगामी चार दिवसांत तापमानात फारसा फरक जाणवत नाही.
आंब्याचा मोहर धोक्यातआंब्याची झाडे मोहराने भरली आहेत. दाट धुक्याचा थेट परिणाम मोहरावर होतो. मोहर गळण्याची भीती असून जिथे फळधारणा झालेली आहे, तिथेही फळ गळण्याचा धोका आहे.
वेलवर्गीय पिकांना फटकाआपल्याकडे साधारणत: डिसेंबर, जानेवारीमध्ये वेलवर्गीय पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. थंडी कमी होऊन उष्णता वाढू लागत असल्याने काकडी, दोडक्याची वाढ जोमात होते. हे धुके काकडी, दोडका, काजूसह पोकळा, मेथी पिकांना मारक ठरणार आहे. पडलेल्या धुक्याने किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे.
उद्या आणि शुक्रवारी ढगाळ वातावरणदिल्लीसह उत्तर भारतात मंगळवारी पाऊस झाल्याने महाराष्ट्रातही हवामानात बदल झाला आहे. आज, बुधवारी आकाश स्वच्छ राहणार असले तरी उद्या, गुरुवारी व शुक्रवारी (दि. २५) ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
तापमान, डिग्रीमध्ये असे राहील -वार किमान कमालबुधवार १५ २८गुरुवार १८ २७शुक्रवार १६ २६शनिवार १३ २६