कोल्हापूर : राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित झालेले कोल्हापूर नियंत्रण कक्षातील सहायक फौजदार दत्तात्रय मासाळ व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार वसंत पन्हाळकर यांचा ‘लोकमत’ परिवारातर्फे शुक्रवारी सन्मान करण्यात आला.यावेळी मुख्य बातमीदार विश्वास पाटील व जाहिरात विभागाचे प्रमुख विवेक चौगुले यांच्या हस्ते या दोघांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. आम्हाला मिळालेले राष्ट्रपती पोलीस पदक हे कोल्हापूरच्या जनतेचे असल्याच्या भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
मासाळ म्हणाले, पोलीस दलात ३२ वर्षे सेवा केली. सर्वाधिक सेवा ही वाहतूक शाखेत तब्बल १४ वर्षे झाली. त्यामुळे सतत जनतेच्या सेवेत असायचो. याचबरोबर प्रसारमाध्यमांनीही आम्हाला चांगली साथ दिली. ड्रेस घातल्यावर आम्ही पोलीस; पण तो ड्रेस काढल्यावर आम्ही पोलिसांसारखे वागलो नाही. जनतेच्या प्रेमामुळे आम्ही चांगले काम करू शकलो. हे सर्व श्रेय जनतेचे व प्रसारमाध्यमांचे आहे. ‘लोकमत’ने माझा सन्मान करून माझ्या कामाची पोहोचपावती दिली.पन्हाळकर म्हणाले, माझी सर्वाधिक सेवा ही वरिष्ठांसोबत झाली. तसेच नेसरी, इचलकरंजी, लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यांतही झाली. मी मूळचा पेठवडगावचा आहे. ‘लोकमत’ने केलेला हा माझा दुसरा सत्कार आहे. यावेळी भारत चव्हाण, समीर देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सर्व सहकारी उपस्थित होते. गणेश शिंदे यांनी आभार मानले.