विश्र्वास पाटील कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाचे (गोकुळ) नेते माजी आमदार महादेवराव महाडिक हेच संघ ‘मल्टिस्टेट’ झाल्यावर त्याचे मालक बनतील, अशी भीती मोठ्या प्रमाणात सामान्य दूध उत्पादकांच्या मनांत आहे. त्यातूनच त्याचे फायदे-तोटे काय होतील याचा विचार न करता या विषयाला सार्वत्रिक विरोध होत आहे. तोच या विषयातील विरोधाचा गाभा आहे. या विषयावरून सुरू असलेले राजकारण पाहता, त्यातून काँग्रेसमधील ऐक्यालाही आणि दोन्ही काँग्रेसमधील संभाव्य आघाडीलाही तडे जाणार आहेत.गोकुळ हा जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. त्यामुळे सुमारे सहा लाख दूध उत्पादक सभासदांच्या संसाराशी जोडलेली ही संस्था आहे. तिच्यावर गेली वीस वर्षे माजी आमदार महाडिक यांचे वर्चस्व आहे. हा संघ ताब्यात असल्यानेच त्यांना जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवता आली आहे.
गेल्या निवडणुकीत त्यांना काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी जोरदार धडक दिली. त्यावेळीच राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी विरोधात भूमिका घेतली असती तर सत्तांतर झाले असते. संघाच्या २०१० च्या निवडणुकीतही तत्कालीन खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी पाठबळ दिल्याने सत्तांत्तर होऊ शकले नाही. त्यामुळे आता मल्टिस्टेट करून संघाचा कारभार एकहाती आपल्या ताब्यात ठेवण्याचा महाडिक यांचा प्रयत्न आहे. त्याला सुरुंग लावण्यासाठीच मल्टिस्टेटला विरोध होऊ लागला आहे.
महाडिक व माजी आमदार पी. एन. पाटील हे जरी संघाचे नेते असले तरी पी. एन. यांना सोबत घेतल्याशिवाय सत्ता शाबूत ठेवता येत नाही, हे माहीत असल्यानेच त्यांना ते हवे आहेत. साखर कारखाने आणि ‘गोकुळ’मध्ये मूलभूत फरक आहे. एक कारखाना अडचणीत आला तर शेजारी दुसरा कारखाना आहे. परंतु दूध संघाच्या बाबतीत असा चांगला पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे चांगल्या चाललेल्या संघाचा पाया डळमळीत झाला तर त्यातून आपले संसार मोडतील अशीही भीती सामान्य लोकांच्या मनांत आहे. हा विरोध ते थेट उघडपणे बोलून दाखवीत नसले तरी खदखद मात्र नक्की आहे.मल्टिस्टेट च्या राजकारणावरून आमदार सतेज पाटील व पी. एन. यांच्यातील मतभेदाची दरी आणखी रुंदावली आहे. गेल्याच महिन्यात काँग्रेसने जनसंघर्ष यात्रा काढून नेत्यांतील मतभेद मिटविण्याचा प्रयत्न केला. खरे तर तेव्हाही हे मतभेद उघड झालेच होते; परंतु आता त्याला थेट दोन गटांचेच स्वरूप आले आहे.
शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके ‘गोकुळ’च्या लढाईत सतेज पाटील व मुश्रीफ यांच्या सोबत येणार असतील तर विधानसभेला काय घडेल हे वेगळे सांगायची गरज नाही. राज्यात दोन्ही काँग्रेसची आघाडी निश्चित मानली जात आहे. पी. एन. पाटील हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यामुळे जिल्हांतर्गत आघाडी करताना ‘गोकुळ’मधील राजकारणाचे पडसाद तिथेही उमटणार आहेत. त्यामुळे गोकुळमधील राजकारणामुळे काँग्रेसअंतर्गत ऐक्याला व दोन्ही काँग्रेसमधील आघाडीलाही तडे जाण्याची शक्यता आहे.कोल्हापूर लोकसभा निवडणुकीच्या राजकारणावरही या घडामोडीचे मोठे परिणाम होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून धनंजय महाडिक यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. शिवसेनेकडून संजय मंडलिक हे रिंगणात असतील. कागल तालुक्यात सध्या गोकुळच्या लढाईत मुश्रीफ, संजय मंडलिक एकत्र आहेत.
मंडलिक हे शिवसेनेचे उमेदवार असतील तर त्यांना संजय घाटगे यांना पाठिंबा द्यावा लागेल; परंतु मुश्रीफ गट महाडिक यांच्या पाठीशी किती प्रामाणिकपणे राहतो याबद्दल साशंकता आहे. विधानसभेला मात्र मंडलिक गट मुश्रीफ यांच्या पाठीशी राहण्याची चिन्हे आहेत. लोकसभा निवडणूक अगोदर असल्याने संजय घाटगे यांना पक्षाबरोबर राहावे लागेल. त्यामुळे तिथे हा राजकीय गुंता होणार आहे.कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात सतेज पाटील हे संजय मंडलिक यांच्या पाठीशी राहतील. तिथे राष्ट्रवादीची ताकद नगण्य आहे. त्यामुळे महाडिक गटाची मदार भाजपचे आमदार अमल महाडिक यांच्यावर असेल. भाजप-शिवसेनेची युती झाली तर महाडिक यांना दाखविण्यापुरते का असेना मंडलिक यांच्यासोबत राहावे लागेल. युती नाहीच झाली तर भाजपचा स्वतंत्र उमेदवार रिंगणात असेल. त्यावेळी मात्र आमदार महाडिक यांचीही कोंडी होऊ शकते.करवीर विधानसभा मतदारसंघात आमदार चंद्रदीप नरके हे लोकसभेला शिवसेनेच्या उमेदवाराच्या मागे राहतील. पी. एन. पाटील यांना राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून खासदार महाडिक यांना पाठिंबा द्यावा लागेल. परंतु महाडिक गट विधानसभेला आपल्याला मदत करत नसल्याची पी.एन. समर्थकांची तक्रार व वस्तुस्थितीही तशीच आहे. त्यामुळे तिथेही चांगलीच गुंतागुंत होणार आहे.
आमदार नरके यांचा गोकुळमध्ये पी. एन. पाटील यांना विरोध होण्यामागे आर्थिकच कारण आहे. दूध संघाकडून पाटील यांच्या राजकारणाला मिळणारी रसद तोडायची हा त्यामागील त्यांचा प्रयत्न आहे. गोकुळच्या गेल्या निवडणुकीत विधानसभा निवडणुकीची उतराई म्हणून मुश्रीफ सत्तारूढ गटाबरोबर राहिले. गोकुळचे संचालक व त्यांचे गट म्हणून त्या त्या परिसरांत त्यांची ताकद आहे.
कागल तालुक्यातील दोन्ही संचालक मुश्रीफ यांचे विरोधकच असल्याने ते संघाच्या विरोधात थेट मैदानात उतरले आहेत. आमदार नरके यांना ज्येष्ठ संचालक अरुण नरके हे सोबत असल्याने व पी.एन. समर्थक संचालक त्यांच्या कायमच विरोधात असल्याने त्यांनाही गोकुळच्या विरोधात उडी घेतली आहे. हीच स्थिती आमदार सतेज पाटील यांचीही आहे.
राधानगरी-भुदरगडमध्ये शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर हे पक्ष म्हणूनही आणि गट म्हणूनही संजय मंडलिक यांच्यासमवेत राहतील हे स्पष्टच आहे. गोकुळचे संचालक हेच त्यांचे विरोधक असल्याने त्यांनाही संघाच्या विरोधातील लढाईत उतरण्यास अडचण नाही. चंदगडमध्ये आता जरी गोकुळचे संचालक राजेश पाटील हे महाडिक यांच्यासमवेत असले तरी लोकसभेला मात्र त्यांचा गट मंडलिक यांच्याबरोबर राहील.
दोन गृहितके...धनंजय महाडिक हे राष्ट्रवादी काँग्रेसकडूनच निवडणूक लढविणार व भाजप-शिवसेनेची युती होणार या गृहितकांवर सध्याच्या राजकीय घडामोडी सुरु आहेत. परंतू युती नाहीच झाली तर पुन्हा राजकीय नकाशा बदलणार आहे. महाडिक यांच्यासाठीही भाजप हा एक पर्याय आहे. त्याचे दरवाजे अजून बंद झालेले नाहीत.