कोल्हापूर : ‘अॅट्रासिटी’चा कायदा कडक करावा, यासह मातंग समाजावर होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधार्थ सकल मातंग समाजातर्फे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. भर पावसातही समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.सकाळपासूनच मातंग समाजबांधव बिंदू चौकात जमायला सुरुवात झाली. या ठिकाणी महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी मातंग समाजावर हल्ले व खून करणाऱ्यांना कायद्याची भीती राहिलेली नाही, या हल्ल्याच्या सर्व घटना माणुसकीला काळिमा फासणाऱ्या आहेत, अशा तीव्र भावना उपस्थित मान्यवर नेत्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केल्या.
यानंतर मोर्चाला सुरुवात झाली. भर पावसातही जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यासह राज्यातूनही समाजबांधव सहभागी होते. छत्रपती शिवाजी रोड, शिवाजी चौक, महापालिका, सी. पी. आर. चौक, दसरा चौक, व्हीनस कॉर्नर, बसंत-बहार टॉकीजमार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला.
या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करीत तीव्र निदर्शने करण्यात आली. ‘मातंग समाजाला न्याय मिळालाच पाहिजे’, ‘मातंग समाजावर हल्ले करणाºयांवर कडक कारवाई व्हावी’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.यानंतर सकल मातंग समाजाचे निमंत्रक बाजीराव नाईक, शंकर तडाखे (पुणे), जगन्नाथ सकट (मुंबई) यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले.भादोेले (ता. हातकणंगले) येथील मातंग समाजातील महिला रंगूबाई कुरणे या महिलेच्या खूनप्रकरणी केस जलदगती न्यायालयात चालविण्यात यावी. राज्यात मातंग समाजावरील अन्याय व अत्याचाराला रोखण्यासाठी सक्षम सरकारी वकिलाची नेमणूक करावी. राज्यातील मातंग समाजातील केसेस अॅड. हरीश साळवे यांच्याकडे द्याव्यात.
मातंग समाजाला संरक्षण द्यावे, अॅट्रासिटी कायदा कडक करावा, जामनेर (जि. जळगाव), रुद्रवाडी (ता. उदगीर, जि. लातूर), कोरेगाव-भीमा, औरंगाबाद, वाटेगाव (ता. वाळवा, जि. सांगली) येथे मातंग समाजावर घडलेल्या अत्याचारांच्या घटनांची सखोल चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशा विविध मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.आंदोलनात बबन सावंत, अॅड. दत्ता कवाळे, रूपा कवाळे, रूपा वायदंडे, रमेश चांदणे, भीमराव साठे, सुकुमार कांबळे, राम कांबळे, आदींसह समाजबांधव सहभागी झाले होते.