कोल्हापूर : विविध नाटके, चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी अभिनेते विजय चव्हाण यांची कोल्हापुरातील अनेक कलाकारांशी जवळीक निर्माण झाली. विशेष म्हणजे ‘नम्र कलाकार’ म्हणून ते सर्वांमध्ये प्रसिद्ध होते. त्यांच्या अचानक जाण्याने या सहृदयी कलाकाराला मुकल्याची भावना मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गजांनी शुक्रवारी व्यक्त केली.
अभिनेते विजय चव्हाण यांचे खूप वर्षांपासून कोल्हापूरशी आपुलकीचे नाते होते. आनंद काळे, सर्जेराव पाटील आणि मिलिंद अष्टेकर या स्थानिक कलाकारांशी त्यांचे मैत्रीचे संबंध होते. दिग्दर्शक यशवंत भालकर आणि महेश कोठारे यांच्या अनेक चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी ते कोल्हापूरला आले होते; पण ते कोल्हापूरकरांच्या लक्षात राहिले ते म्हणजे त्यांच्या ‘मोरुच्या मावशी’ नाटकातील मावशीच्या पात्रामुळे. केशवराव भोसले नाट्यगृहात ‘मोरुच्या मावशी’चे झालेले सर्व प्रयोग हाउसफुल्ल झाले होते. विशेष म्हणजे कोल्हापुरात चव्हाण यांचे दोन दिवसांचे चित्रीकरण असले की त्यांना येथील दिग्दर्शक तीन दिवसांच्या चित्रीकरणासाठी करारबद्ध करत असत. कारण दोन दिवस ते चित्रीकरणात गर्क असायचे आणि उरलेल्या एका दिवसात विश्रांती घेत.
विजय चव्हाण केवळ विनोदी कलाकार नव्हता. कोणतीही भूमिका तो अत्यंत गांभीर्याने करत असे. माझ्या ‘पैज लग्नाची’, ‘घे भरारी’, ‘नाथा पुरे आता’ आणि ‘आबा जिंदाबाद’, आदी चित्रपटांत त्याने काम केले आहे. दिग्दर्शकाला मान देणारा व नम्र कलाकार होता.- यशवंत भालकर, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शकमाझा व त्यांचा परिचय कोल्हापुरातील ‘मोरुच्या मावशी’ च्या पहिल्या प्रयोगापासून पक्का मित्र असा झाला. खासीयत म्हणजे त्याने या आधुनिक जगाची कास धरतानाही मोबाईल फोन कधी वापरला नाही, हे विशेष होय. चित्रीकरणाच्या तारखा, व्यवहाराचे बोलणेही तो दूरध्वनीवरून करत होता.- मिलिंद अष्टेकर, ज्येष्ठ निर्मिती व्यवस्थापक