कोल्हापूर : बांधकाम व्यावसायिक सुनील बाळकृष्ण गेंजगे यांच्या आत्महत्येप्रकरणी कोणत्याही राजकीय दबावास बळी न पडता पोलिसांनी या प्रकरणी सखोल चौकशी करावी; तसेच गेंजगे कुटुंबीयांना पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक यांनी गुरुवारी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
प्रा. मंडलिक म्हणाले, शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळकृष्ण गेंजगे यांचे चिरंजीव बांधकाम व्यावसायिक सुनील गेंजगे यांनी खासगी सावकाराच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे.
हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. कोल्हापूर शहरात खासगी सावकारकी वाढली आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्यांना टक्केवारीमध्ये गुरफटून त्यांच्याकडील सर्व मालमत्ता हडप करणारी टोळी शहरात राजकीय पाठबळामुळे मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्याचे दिसत आहे. हाच राजकीय दबाव गेंजगे आत्महत्याप्रकरणी संशयित आरोपींवरील कारवाई टाळण्यासाठी पोलीस यंत्रणेवर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकरणी कोणताही राजकीय दबाव न घेता पोलीस तपास करावा.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार म्हणाले, गेंजगे कुटुंबीयांची भेट घेतली असता सर्व कुटुंबीय भेदरलेल्या मन:स्थितीत असल्याचे आढळले. त्यांच्या जिवाला संशयितांकडून धोका निर्माण झाला आहे. तरी गेंजगे कुटुंबीयांना तातडीने पोलीस संरक्षण मिळावे.
यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख म्हणाले, हा प्रकार गंभीर असून, या प्रकरणी आम्ही सर्व पातळ्यांवर तपास सुरू करीत आहेत. खासगी सावकारांबाबत काही तक्रारी असतील तर नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.यावेळी मुरगूडचे नगराध्यक्ष राजेखान जमादार, देवस्थान समितीचे सदस्य शिवाजीराव जाधव, सचिव विजय शिवाजीराव जाधव, दुर्गेश लिंग्रस, कमलाकर जगदाळे, शशी बिडकर, दिनेश परमार, राजेंद्र पाटील, रवी चौगुले, दत्ता टिपुगडे, धनाजी यादव, आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.