कोल्हापूर : रुग्णालयात सोनोग्राफी करण्याचा बहाणा करीत शुक्रवार पेठेत राहणाऱ्या क्षीरसागर या महिलेसह टोळीने जिल्ह्यातील अनेक डॉक्टरांकडून लाखो रुपयांची खंडणी गोळा केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. कोल्हापूर-चंदगड ते मुंबई असा ह्या रॅकेटचा समावेश असून, ‘खून का बदला खून’ प्रकरणातून निर्दोष सुटलेला ‘डॉक्टर’ या रॅकेटचा म्होरक्या असल्याचे पुढे आले आहे.
संशयित महिलेने डॉक्टरांना मोबाईलवरून दिलेल्या धमकीचे रेकॉर्ड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये ‘डॉक्टर’च्या नावाचा स्पष्ट उल्लेख आहे. महिला पसार असून तिचे आणि डॉक्टरचे कॉल डिटेल्स पोलिसांनी मागविले आहेत. त्यामध्ये दोघांचे वारंवार संभाषण आढळून आल्यास डॉक्टरला गजाआड करण्याची तयारी पोलिसांनी केली आहे.डॉ. संतोष मुरलीधर वाघुले (वय ४६, रा. निंबाळकर कॉलनी, कावळा नाका) यांचे शाहूपुरी साईक्स एक्स्टेंशन येथे कोल्हापूर डायग्नोस्टिक सेंटर व राजारामपुरीत तिसऱ्या गल्लीत जानकी हॉस्पिटल आहे. त्यांना धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी संशयित अविनाश आनंदराव सावंत याला अटक केली आहे.
संशयित क्षीरसागर या महिलेने डॉ. वाघुले यांना अनेक वेळा मोबाईलवरून खंडणीसाठी धमकी दिली आहे. त्यामध्ये मी गुंड ‘डॉक्टर’ गँगच्या जवळची असल्याचे रेकॉर्डिंग पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा डॉक्टर ‘खून का बदला खून’ प्रकरणातून निर्दोष सुटला आहे. त्याचे मुंबईतील गँगवॉरशी जवळचे हितसंबंध आहेत.
कोल्हापुरातही त्याच्या आजूबाजूला गँगवार आहे. त्याच्या नावाचा या ‘क्षीरसागर’ महिलेने वापर केला आहे. त्यामध्ये खरेच डॉक्टरचा समावेश आहे काय? की त्याच्या नावाचा वापर केला आहे, याबाबत पोलीस कसोशीने शोध घेत आहेत. महिलेच्या कॉल लिस्टमध्ये डॉक्टराशी वारंवार बोलणे झाल्याचे आढळून आल्यास डॉक्टरलाही गजाआड करण्याची तयारी पोलिसांनी केली आहे.
गुन्हा दाखल झाल्याची चाहूल लागताच ती पसार झाली आहे. तिने अनेक डॉक्टर, व्यापाऱ्यांना ब्लॅकमेल केल्याचे पुढे येत आहे. तिच्यावर गुन्हा दाखल झाल्याचे समजताच अनेक डॉक्टरांनी पोलीस निरीक्षक संजय मोरे यांचे फोनवरून अभिनंदन केले. डॉक्टर व्यवसायामुळे व गुंडांच्या धमकीमुळे आम्ही भीतीपोटी पुढे येत नसल्याचेही त्यांनी सांगितले. या टोळीने लाखो रुपये खंडणीतून मिळवल्याचेही सांगितले.पक्षातून हकालपट्टीसंशयित क्षीरसागर महिला राज्यातील एका आघाडीच्या सत्ताधारी पक्षामध्ये होती. तिने पक्षातील बड्या नेत्यांना अशाच प्रकारे ब्लॅकमेल करून अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तिची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर तिने गुन्हेगारी साम्राज्यातील डॉक्टरशी हातमिळवणी केली. या प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.