कोल्हापूर : मराठा युवकांनी उद्योग क्षेत्राकडे वळावे. त्यांना लागेल ती सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही खासदार संभाजीराजे यांनी येथे केले.मार्केट यार्ड येथील शाहू सांस्कृतिक भवन येथे मराठा उद्योजक लॉबीतर्फे आयोजित राज्यव्यापी मराठा उद्योजक मेळाव्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी उद्योजक लॉबीचे नेते उद्योजक विनोद बडे होते.
प्रमुख उपस्थिती मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, उद्योजक चंद्रकांत जाधव, उद्योजक लॉबीचे प्रदेशाध्यक्ष सुदर्शन झिंजुर्डे (नाशिक), सरचिटणीस अमोल महाडिक (नाशिक), प्रसिद्धीप्रमुख स्वप्निल काळे (नाशिक), संयोजक संदीप पाटील (सांगली), अनिल सुरवसे (पुणे), विनय निकम, उद्योजिका सुप्रिया जगदाळे (पुणे), सुनीता जाधव (सांगली), आदींची होती.खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलनाने मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले.संभाजीराजे म्हणाले, राजर्षी शाहू छत्रपतींनी आपल्या कार्यकाळात उद्योगांना चालना देत अनेक युवकांना उद्योजक म्हणून उभे केले. मराठा युवकांनीही उद्योग क्षेत्राकडे वळावे. त्यांना लागेल ती मदत आपण करू; परंतु कष्टाची तयारी ठेवावी लागेल.मुळीक म्हणाले, मराठा समाज आर्थिक अरिष्टात आहे. त्यामुळे उद्योजक बनणे हे आव्हान आहे; परंतु त्यांनी आत्मविश्वासाने सामोरे जाऊन शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतल्यास त्यांना यश नक्की मिळेल. सुदर्शन झिंजुर्डे म्हणाले, मराठा समाज व्यवसायात खूपच मागे आहे. सध्या बहुसंख्य समाज हा ग्राहक असून, तो उत्पादक व उद्योजक होण्याची गरज आहे.चंद्रकांत जाधव म्हणाले, व्यवसाय करताना कष्ट, नावीन्याचा शोध व चिकित्सकपणा अंगी असला पाहिजे. विनय कदम म्हणाले, शेती हासुद्धा एक व्यवसाय असून त्यामुळे विविध उत्पादने घेऊन आधुनिक शेती करता येते.
सुप्रिया जगदाळे म्हणाल्या, महिलांनी घरापुरते सीमित न राहता कोणत्या ना कोणत्या उद्योगात पाऊल टाकण्याचा प्रयत्न करावा. संदीप पाटील यांनी सूत्रसंचालन व प्रास्ताविक केले. स्वप्निल पाटील यांनी आभार मानले. यावेळी उद्योजक उत्तम जाधव, अशोक झांबरे, निवास पाटील, राजेश शिंदे, आदी उपस्थित होते.
मोटारसायकल रॅलीद्वारे ‘लाख मराठा’चा जयघोषमेळाव्यापूर्वी रुईकर कॉलनी येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मेळाव्याच्या ठिकाणापर्यंत मराठा युवकांच्या वतीने मोटारसायकल रॅली काढण्यात आली. यावेळी ‘एक मराठा, लाख मराठा’, ‘मराठा आर्थिकदृष्ट्या सक्षम झालाच पाहिजे,’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
मेळाव्यासाठी सुमारे ८०० प्रतिनिधी उपस्थितया मेळाव्यासाठी राज्यासह गुजरात व कर्नाटकमधून सुमारे ८०० मराठा युवक प्रतिनिधी उपस्थित होते. दिवसभर सुरू असलेल्या या मेळाव्यात विविध मराठा उद्योजकांनी या युवकांना मार्गदर्शन केले. तसेच सभागृहाशेजारी खाद्यपदार्थ, कपडे, विविध वस्तूंचे सुमारे २५ स्टॉल्स उभे करण्यात आले होते. पंढरपूर, बुलढाणा, अमरावती, नाशिक, अहमदनगर, विरार येथील युवकांचा यामध्ये समावेश होता.