कोल्हापूर : मराठी लेखक राजकारणापासून दूर राहणारे आहेत. त्यांना राजकारण आणि त्याच्या चित्रीकरणाची भीती वाटते. या लेखकांनी खंबीर भूमिका घेऊन बदल, परिवर्तनाच्यादृष्टीने लेखन करावे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी सोमवारी येथे केले.साहित्यिक उत्तम कांबळेलिखित ‘पारध्याची गाय’ या कथासंग्रहाच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. शाहू स्मारक भवनमध्ये ‘निर्मिती विचारमंच’तर्फे आयोजित या कार्यक्रमास लेखिका शशी राय, भास्कर भोसले प्रमुख उपस्थित होते.डॉ. कोत्तापल्ले म्हणाले, ‘राजकारण आणि त्याच्या चित्रीकरणाला अधिकतर मराठी लेखक घाबरतात. देशातील अस्वस्थ परिस्थितीमध्ये मराठीतील आमचे अनेक लेखक हे मनोविश्लेषण करत होते. नव्या भारताची जडणघडण सुरू असताना पश्चिमात्त्य कादंबरी यांच्या नकला करण्याचे त्यांचे काम सुरू होते. नवीन समाज घडताना तत्कालीन परिस्थिती शब्दबध्द करण्याची लेखकाची जबाबदारी असते. ही जबाबदारी कांबळे यांनी पेलली आहे.’या कार्यक्रमात लेखक उत्तम कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शंकर पुजारी, अमर कांबळे, कृष्णा पाटील, चिंतामणी कांबळे, आदी उपस्थित होते. अरविंद पाटकर यांनी स्वागत केले. अनिल म्हमाने यांनी प्रास्ताविक केले. कवी साहिल शेख यांनी सूत्रसंचालन केले. शोभा चाळके यांनी आभार मानले.