कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून पोलीस प्रशासनाच्यावतीने उत्तम आरोग्यासाठी पाच किलोमीटर मॅरेथॉनचा शुभारंभ परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांचे हस्ते करण्यात आला.पोलिसांचे आरोग्य चांगले राहावे, तणावमुक्ती दूर व्हावी यासाठी पोलीस प्रशासनाच्यावतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त नवीन उपक्रम सुरू करण्यात आला. पोलीस मुख्यालयातील अलंकार हॉल येथे मंगळवारी पहाटे योग प्रकारानंतर पाच किलोमीटर मॅरेथॉनचा शुभारंभ करण्यात आला.
विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, पोलीस अधीक्षक संजय मोहिते, अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, गृह पोलीस उपअधीक्षक सतीश माने, शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांच्यासह ३० अधिकारी, १५० पोलीस कर्मचारी सहभागी झाले.
यावेळी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शाहूपुरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी शिवाजी पाटील यांनी शाहू महाराजांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल माहिती दिली. त्यांचे मनोगत ऐकून नांगरे-पाटील यांनी एक हजार रुपयांचे बक्षीस पाटील यांना दिले.