कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती पदासाठी मंगळवारी (दि. ११) दुपारी एक वाजता संचालक मंडळाची सभा बोलावण्यात आली आहे. उपसभापती पदासाठी उदयसिंह पाटील-कावणेकर व सुमन नानासाो पाटील यांच्यात चुरस आहे.बाजार समितीचे उपसभापती अमित कांबळे यांनी राजीनामा दिल्याने रिक्तपदी कागल-राधानगरीच्या प्रांताधिकारी मनीषा कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड होत आहे. सभापतिपदी जनसुराज्य पक्षाचे बाबासो लाड यांची निवड झाली असून, उपसभापती पद राष्ट्रवादी कॉँग्रेसला मिळणार आहे. त्यानुसार उदयसिंह पाटील, सुमन पाटील व शेखर येडगे या तिघांनी दावा सांगितला आहे.
सभापती पद हे लाड यांच्या रूपाने शाहूवाडीला गेल्याने उपसभापती पदही तिथेच देण्यास नेते तयार होणार नाहीत. त्यातून येडगे यांचे नाव मागे पडत आहे.
सुमन पाटील यांच्यासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील हे आग्रही आहेत; पण बाजार समिती निवडणुकीत उमेदवारी देताना करवीरला डावलले, एकमेव उदयसिंह पाटील यांच्या रूपाने संधी दिली; त्यामुळे पाटील यांचा उपसभापती पदावर दावा राहू शकतो.