कोल्हापूर : महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे ९०० महिला बचत गटांना १६ कोटी कर्ज देण्यात आले आहे. तसेच महामंडळाच्या बचत गटांनी तयार केलेली २०० उत्पादने सध्या अॅमेझॉनवर विक्रीसाठी ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहेत, अशी माहिती महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे यांनी येथे दिली.मनपाडळे (ता. हातकणंगले) येथील प्रेरणा लोकसंचलित साधन केंद्रात भेट देऊन बचत गटातील महिलांशी संवाद कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी विभागीय सहनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी विलास बच्चे, ‘माविम’चे जिल्हा समन्वय अधिकारी बाळासाहेब झिंजाडे, आदी प्रमुख उपस्थित होते.ठाकरे म्हणाल्या, ‘माविम’च्या बचत गटांना विविध व्यवसाय-उद्योगासाठी अधिकाधिक अर्थसाहाय्य केले जात आहे. आॅक्टोबर महिन्यात जिल्ह्यातील १६० बचत गटांना सव्वा कोटीचे कर्ज उपलब्ध करून दिले आहे. बचत गटांनी कर्जाचा योग्य विनियोग करून शंभर टक्के परतफेड करावी.यावेळी ठाकरे यांच्या हस्ते राजलक्ष्मी स्वयंसाहाय्यता महिला बचत गट (जाखले) यांना ५ लाख ८६ हजार रुपये व धन्यवाद स्वयंसाहाय्यता महिला बचत गट (वाठार) यास ६ लाख ३७ हजार रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले. दोन दिवसीय जिल्हा दौऱ्यावर असलेल्या ज्योती ठाकरे यांनी ‘माविम’ जिल्हा कार्यालयाच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी ‘माविम’चे लेखाधिकारी विनायक कुलकर्णी, सहा. सनियंत्रण अधिकारी उमेश लिंगनूरकर, लेखा साहाय्यक विजय कलकुटकी, सारिका पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
मनपाडळेत फुलली फुलशेतीमनपाडळेतील मोरया गटाच्या वैशाली बाजीराव शिंदे यांनी माळरानावर केलेल्या फुलशेतीची पाहणी ठाकरे यांनी केली. फुलशेतीसाठी ठिबक व इतर आधुनिक तंत्रज्ञानाचा करण्यात आलेला अवलंब मोलाचा असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर बचतगटांनी सुरू केलेल्या आठवडी बझारचीही त्यांनी पाहणी केली.