कोल्हापूरचे महापौर, उपमहापौरांची नावे बुधवारी स्पष्ट होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 06:23 PM2018-12-04T18:23:29+5:302018-12-04T18:30:57+5:30
कोल्हापूरचे महापौर-उपमहापौर कोण होणार, निवडणूक चुरशीची होणार की एकतर्फी, भाजप-ताराराणी आघाडी यावेळी तरी कॉँग्रेस-राष्ट्रवादीला खिंडार पाडणार का, शिवसेनेचे चार नगरसेवक आपली मते कोणाच्या पारड्यात टाकणार, या उत्कंठा वाढविणाऱ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे बुधवारी मिळणार आहेत.
कोल्हापूर : कोल्हापूरचेमहापौर-उपमहापौर कोण होणार, निवडणूक चुरशीची होणार की एकतर्फी, भाजप-ताराराणी आघाडी यावेळी तरी कॉँग्रेस-राष्ट्रवादीला खिंडार पाडणार का, शिवसेनेचे चार नगरसेवक आपली मते कोणाच्या पारड्यात टाकणार, या उत्कंठा वाढविणाऱ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे बुधवारी मिळणार आहेत.
राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून महापौरपदाचे उमेदवार म्हणून कोणाचे नाव जाहीर होणार यावर या निवडणुकीतील चुरस स्पष्ट होईल; तसेच पुढील घडामोडी घडतील. त्यामुळे निवडणुकीत काय होणार, याकडे महापालिका वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.
कोल्हापूरच्या महापौर-उपमहापौरपदाची निवडणूक सोमवारी (दि. १०) होत असून त्याकरिता बुधवारी दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळेत उमेदवारी अर्ज भरायचे आहेत.
महानगरपालिकेतील पक्षीय बलाबल पाहता महापौर, उपमहापौर कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे होतील, यात शंकाच वाटत नाही; परंतु या दोन्ही पदांसाठी पक्षांतर्गत चुरस आणि संघर्ष उफाळून आला असल्यामुळे, उमेदवारी कोणाला मिळते यावरच बऱ्याच घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
यावेळी राष्ट्रवादी पक्षाकडून अॅड. सूरमंजिरी राजेश लाटकर, सरिता नंदकुमार मोरे, माधव प्रकाश गवंडी, अनुराधा सचिन खेडकर या मान्यवर नगरसेविकांनी आग्रही दावा केला आहे. त्यात लाटकर आणि मोरे आघाडीवर आहेत.
उपमहापौर पदासाठी अशोक जाधव, भूपाल शेटे, श्रावण फडतारे यांची नावे आघाडीवर होती. या यादीतील नामावलीत संजय मोहिते, शोभा कवाळे, वृषाली कदम यांचाही समावेश झाल्यामुळे कॉँग्रेसमध्येही संघर्ष असल्याचे स्पष्ट होत आहे. या पदावर एखाद्या ज्येष्ठ नगरसेवकाची निवड होण्याची शक्यता दिसते. स्वाभाविकच जाधव, शेटे, मोहिते यांच्यात ही चुरस राहील.
भाजप-ताराराणीचे लक्ष कॉँग्रेस-राष्ट्रवादीतील घडामोडींवर
महापौर-उपमहापौरपदाची निवडणूक अगदी तोंडावर आली असतानाही भाजप-ताराराणी आघाडीत फारशा हालचाली दिसत नाहीत. त्यांच्या आघाडीच्या नेत्यांचे व कारभाऱ्यांचे सगळे लक्ष कॉँग्रेस-राष्ट्रवादीतील घडामोडींवर खिळून राहिले आहे.
दरम्यान, भाजप-ताराराणी आघाडीकडून महापौरपदाच्या उमेदवार जयश्री जाधव या असतील. सविता भालकर, उमा इंगळे यांची नावे चर्चेत आहे.निवडणूक जिंकण्याची आशा असेल तरच जाधव यांचा उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे.
सत्ताधाऱ्यांचे प्रत्येकी चार, तर विरोधकांचे तीन अर्ज
राष्ट्रवादीचे गटनेते सुनील पाटील यांनी मंगळवारी नगरसचिव कार्यालयातून महापौरपदासाठी चार, तर कॉँग्रेस गटनेते शारंगधर देशमुख यांनी उपमहापौरपदासाठी चार अर्ज नेले. भाजप - ताराराणी आघाडीतर्फे दोन्ही पदांसाठी गटनेते विजय सूर्यवंशी यांनी तीन-तीन अर्ज नेले.