कोल्हापूर : साम-दाम-दंड या राजकारणातील त्रिसूत्रीचा अवलंब करीत भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीत ‘राष्ट्रवादी कॉँग्रेसला खिंडार पाडण्याची रणनीती आखली आहे. त्यांची व्यूहरचनेची आखणी पूर्ण झाली असून, ‘राष्ट्रवादीतील नाराज नगरसेवकांना हेरण्याची, त्यांच्याशी चर्चा सुरू ठेवण्याची प्रक्रिया गेल्या काही दिवसांपासून सुरू झाली आहे. भाजपच्या रणनीतीला जर यश आले तर मात्र कोल्हापूर महानगरपलिकेतील सत्तांतर अटळ असल्याची चर्चा आहे.कोल्हापूर जिल्ह्यातून भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व पालकमंत्री चंद्रकांत पाटील करीत आहेत. त्यांना काहीही करून महानगरपालिकेत भाजपचा महापौर करायचा आहे. त्यासाठी वाटेल तेवढी किंमत मोजण्याची त्यांची तयारी आहे; परंतु गेल्या अडीच वर्षांत त्यांना सर्व सत्तासाधने हाताशी असूनही ते शक्य झाले नाही.
गेल्या अडीच वर्षांत बरेच पाणी पुलाखालून गेले असून, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती आता बदलली आहे. या काळात महापालिकेत कॉँग्रेस-‘राष्ट्रवादीची सत्तेत असूनही काहीच उपयोग झाला नसल्याने या पक्षाच्या नगरसेवकांत कमालीची नाराजी व अस्वस्थता आहे. पण उघड बोलायचं कोणी? हा प्रश्न असल्याने अंतर्गत नाराजीचा धूर अधूनमधून बाहेर येत आहे. त्याचे प्रत्यंतर स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत आले.गेल्या काही महिन्यांपासून ही नाराजी हेरून तिचा लाभ उठवायचा प्रयत्न भाजपकडून होताना दिसतो आहे. नुकत्याच झालेल्या स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत त्याची रंगीत तालीम झाली. अजिंक्य चव्हाण व अफजल पीरजादे शेवटच्या क्षणापर्यंत कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या गोटात राहिले आणि सभागृहात उलटे मतदान करून त्यांनी पक्षनेतृत्वालाच आव्हान दिले.
पक्षादेश डावलून मतदान केल्यामुळे त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याकरिता राष्ट्रवादीकडून तक्रार करण्यात आली आहे; परंतु त्यांना भाजपकडून संरक्षण दिले जाण्याची शक्यता आहे. त्यांच्याविरुद्धच्या सुनावणीचे काम रेंगाळत ठेवण्यात आले आहे. पोलीस खात्याने एका नगरसेविकेच्या पतीविरुद्ध ‘मोक्का’ कारवाईचा प्रस्ताव तयार केला आहे. आता ही कारवाई टाळायची असेल तर शेवटी पालकमंत्रीच पर्याय असेल.कॉँग्रेस तसेच ‘राष्ट्रवादीतील नाराजी, आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडलेले नगरसेवक, कोणाला कायद्याच्या कचाट्यात अडकविता येईल याची सविस्तर माहिती गोळा करण्यात येत आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत केवळ घोडेबाजार होणार नाही तर कायद्याचा धाक दाखवून तसेच पुढील अडीच वर्षात नगरसेवक पदाला संरक्षण देण्यासह काही पदे देण्याचे आमिष दाखविले जात आहे. त्यामुळे महापौर स्वाती यवलुजे यांची मुदत संपल्यानंतर म्हणजे १५ मेनंतर या सगळ्या हालचाली गतिमान होणार आहेत.
भाजपतर्फे जयश्री जाधव यांचे नाव निश्चितमहापौरपदावर १६ मेनंतर विराजमान होणारा उमेदवार हा सर्वसाधारण महिला प्रवर्गातील असेल. नवीन महापौरपदाची निवडणूक ही कॉँग्रेस विरुद्ध भाजप यांच्यात होणार आहे. कॉँग्रेसची उमेदवारी मिळावी म्हणून अनेक जण इच्छुक आहेत. त्यामध्ये शोभा बोंद्रे, इंदुमती माने, जयश्री चव्हाण यांची नावे चर्चेत अग्रभागी आहेत. मात्र कोणाला उमेदवारी मिळेल हे आताच सांगणे कठीण आहे. परंतु भाजपकडून मात्र जयश्री जाधव यांचे नाव निश्चित करण्यात झाल्याचे सांगण्यात आले. जयश्री या उद्योगपती चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी आहेत.
असा होऊ शकतो बदलमहापालिकेत शिवसेनेचे चार नगरसेवक असून त्यांनी कॉँग्रेस-‘राष्ट्रवादीला पाठिंबा दिला आहे. या चार नगरसेवकांना आपल्याकडे ओढून घेण्याचा भाजपचा प्रयत्न असून तशी बोलणी राज्य पातळीवरील नेत्यांत सुरू आहेत. या प्रयत्नात अपयश आले तर स्थानिक पातळीवर किमान दोन नगरसेवकांना तरी फोडण्याचा प्रयत्न होऊ शकतो.सध्या कॉँग्रेस - ‘राष्ट्रवादीचे संख्याबळ ४४ असून त्यांना शिवसेनेची चार नगरसेवक मिळाले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे ४८ मतांची जोडणी आहे. जर भाजपने ‘राष्ट्रवादीतून दहा नगरसेवक फोडले तर त्यांना कायद्यानुसार नगरसेवकपदास संरक्षण मिळेल. दहाजणांचा स्वतंत्र गट करून सभागृहात बसणे शक्य होईल. असे घडलेच तर भाजप-ताराराणी आघाडीचे संख्याबळ ३३ वरून ४३ वर जाईल. त्याच वेळी कॉँग्रेस-‘राष्ट्रवादीचे संख्याबळ दहाने घट होऊन ते ४८ वरून ३८ पर्यंत खाली जाईल.