कोल्हापूर : कोल्हापूर इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीच्या अभियंत्रिकी महाविद्यालयाला (केआयटी) अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या राष्ट्रीय मूल्यांकन मंडळाच्या (एनबीए) सातसदस्यीय समितीने भेट दिली. या समितीने शुक्रवार ते रविवारदरम्यान पर्यावरणशास्त्र, अभियांत्रिकी, मेकॅनिकल, बायोटेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग विद्याशाखांचे परीक्षण केले.यावेळी इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स, बंगलोरचे माजी प्राध्यापक डॉ. डी. तुकाराम यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये मेकॅनिकल विभागासाठी डॉ. कनुज रामजी (कुलगुरू, डॉ. बी. आर. आंबेडकर विद्यापीठ, आंध्रप्रदेश), डॉ. नरेंद्रसिंग (एम. एम. यू. टी., गोरखपूर), एन्व्हायर्न्मेंंटल विभागासाठी डॉ. अन्वर खुर्शीद, मोहम्मद ओवेसी (अलिगढ मुस्लिम विद्यापीठ, उत्तर प्रदेश), डॉ. सुब्रतो रॉय (एनआयटीटीटीआर, भोपाळ), बायोटेक्नॉलॉजी विभागासाठी डॉ. जी. एस. रांधवा (आयआयटी, रुरकेला, उत्तराखंड) यांचा समावेश होता.
या भेटीदरम्यान तीन विभागांच्या प्रत्येकी दोन तज्ज्ञांनी त्या विभागांचे कामकाज, अध्ययन-अध्यापन पद्धती, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, शिक्षकांंची संख्या, त्यांची शैक्षणिक अर्हता, त्यांनी प्रसिद्ध केलेल्या शोधनिबंधांचा दर्जा, विद्यापीठाचे प्रथम व अंतिम वर्षाचे निकाल, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठीचे विशेष उपक्रम अशा अनेक बाबींची तपासणी करून कागदपत्रांची पडताळणी केली.
समितीचे अध्यक्ष डॉ. आर्या यांनी प्रथम वर्ष अभियांत्रिकी व कार्यालयीन कामकाजाचे परीक्षण केले. या भेटीदरम्यान प्रशासन, अकौंट्स, वसतिगृह, प्रयोगशाळा, क्रीडा, एनएसएस, ग्रंथालय या विभागांची व अन्य सुविधांची तपासणी केली गेली. या भेटीच्या दुसऱ्या दिवशी समितीने ‘केआयटी’चे आजी, माजी विद्यार्थी, पालक, उद्योजक यांची मते जाणून घेतली.
या भेटीच्या नियोजनासाठी ‘केआयटी’चे अध्यक्ष भरत पाटील, उपाध्यक्ष सुनील कुलकर्णी, सचिव दीपक चौगुले, विश्वस्त डॉ. व्ही. व्ही. कार्जिन्नी, रजिस्ट्रार डॉ. एम. एम. मुजुमदार यांचे मार्गदर्शन लाभले. प्रमुख समन्वयक किशोर हिरासकर यांनी या भेटीचे नियोजन केले.
समितीकडून समाधानया भेटीच्या समारोपप्रसंगी समितीने भेटीबद्दल आणि केआयटीच्या शैक्षणिक प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. गुणवत्ता वाढीसाठीच्या उल्लेखनीय उपक्रमांची प्रशंसा केली. ‘केआयटी’ची बलस्थाने सांगून शैक्षणिक सुधारणांसाठी विविध उपाययोजना सुचविल्या आहेत, अशी माहिती ‘केआयटी’चे अध्यक्ष भरत पाटील यांनी दिली.