कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात उभारण्यासाठी शेंडा पार्क येथील जागेबाबत सोमवारी पुण्यात बैठक होत आहे. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर हे खंडपीठ कृती समितीशी चर्चा करणार आहेत.कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर या सहा जिल्'ांसाठी होणाऱ्या सर्किट बेंचसाठी कोल्हापुरात शेंडा पार्कातील सुमारे ७५ एकरांची विस्तीर्ण जागा निश्चित करण्यात यावी, अशी मागणी गेल्या महिन्यात मुंबई येथे खंडपीठ कृती समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेंडा पार्कमधील जागेबाबत कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करण्याच्या सूचना विधि व न्याय विभागाला दिल्या होत्या.
यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाशी पत्रव्यवहार करण्यात आला असून, शेंडा पार्क येथे मागणीप्रमाणे ७५ एकर एवढी जागा वाटपासाठी उपलब्ध आहे काय? असल्यास त्याबाबत योग्य ती तपासणी करून जागामागणीचा प्रस्ताव स्पष्ट अभिप्रायासह पुणे विभागीय आयुक्तांमार्फत शासनास पाठवावा, अशा सूचना केल्या आहेत. विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर हे ११ जुलैला कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. त्यांनी खंडपीठ कृती समितीला बैठकीचे निमंत्रण दिले आहे.बैठकीसाठी कृती समितीचे निमंत्रक अॅड. प्रशांत चिटणीस, उपाध्यक्ष सुशांत गुडाळकर, अभिषेक देवरे, विवेक घाटगे, प्रकाश मोरे, आनंदराव जाधव, दीपक पाटील, अशोक पाटील, एस. डी. चौगले, गिरीष खडके, पिटर बारदेस्कर, विजय पाटील आदी पदाधिकारी बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत. ते सोमवारी पहाटे पुणे येथे जाणेसाठी रवाना होणार आहेत.