कोल्हापूर : श्री अंबाबाईच्या किरणोत्सवाातील अडथळ््यांसंदर्भात आयोजित करण्यात आलेली बैठक सुरु होण्याआधीच संपली. चर्चेसाठी देवस्थानसह विविध पदाधिकारी व मिळकतदार येवून अर्धा तास झाल्यानंतरही आयुक्त बैठकीला आले नसल्याने त्यांचा निषेध करून सर्वजण महापालिकेतून निघून गेले.अंबाबाईचा किरणोत्सव गुरुवारपासून (दि.८) सुरु होत आहे. त्या पार्श्वभूमीवर अडथळे काढण्यासंबंधी दोन दिवसांपूर्वी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या शिवाजी पेठेतील कार्यालयात बैठक घेण्यात आली. अडथळे हटवण्याचे काम महापालिकेचे असल्याने यावेळी समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दुरध्वनीवरून डॉ. अभिजीत चौधरी यांच्याकडे बैठकीची वेळ मागितली होती.
बैठकीसाठी आयुक्तांनी सोमवारी सायंकाळी साडे पाचची वेळ दिली होती. ठरल्याप्रमाणे देवस्थान समितीचे पदाधिकारी, किरणोत्सव अभ्यासक, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे तसेच ज्यांच्या इमारतींचा अडथळा येतो ते मिळकतदार हे सर्वजण साडेपाच वाजता महापालिकेत आयुक्तांच्या कार्यालयाशेजारी असलेल्या मिटींग हॉलमध्ये गेले.आयुक्तांची दिव्यांगांसोबत सुरु असलेले बैठक पुढे अर्धा तास लांबली. या कालावधीत शिष्टमंडळाने दोन तीन वेळा आयुक्तांना निरोप पाठवला. मात्र त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद न आल्याने सर्वजण आयुक्तांचा निषेध करत मिटींग हॉलमधून निघाले.
शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी याबाबत दिलगिरी व्यक्त केली मात्र चिडलेले पदाधिकारी व शिष्टमंडळ बैठकीसाठी न थांबताच महापालिका चौकात आले. येथे आयुक्तांचा पुन्हा एकदा निषेध करुन निघून गेले. यावेळी समितीचे सदस्य शिवाजीराव जाधव, संगीता खाडे, सचिव विजय पोवार, अभियंता सुदेश देशपांडे उपस्थित होते.
आयुक्तांना अंबाबाईच्या किरणोत्साचा प्रश्न मार्गी लावायचा नाही म्हणून त्यांनी बैठक घेण्यात जाणीवपूर्वक चालढकल केली. वारंवार निरोप पाठवूनही त्यांनी प्रतिसाद न देवून आमचा अपमान केला आहे.महेश जाधव ,अध्यक्ष प. म. देवस्थान समिती
अंबाबाई भक्तांच्या भावनांशी निगडीत असलेल्या या विषयाचे आयुक्तांना गांभीर्य नाही. आधी वेळ देवूनही त्यांनी बैठक घेतली नाही कारण त्यांना हा प्रश्नच सोडवायचा नाही.संजय पवार , उपाध्यक्ष,अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ