कोल्हापूर : आदर्श शिक्षण संस्था, कोथळी (ता. शिरोळ) या संस्थेला अल्पसंख्याक दर्जा मिळण्यासाठी खोटे शिक्के, सह्या करून धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या बनावट आदेशाचे पत्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभाग मंत्रालयास सादर करून फसवणूक केल्याचे उघडकीस आले.
या प्रकरणी धर्मादाय आयुक्त विभागाचे अधीक्षक शिवराज बंडोपंत नाईकवडे (वय ४०, रा. टेंबलाईवाडी, कोल्हापूर) यांनी सोमवारी (दि. २९) शाहूपुरी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात फिर्याद दिली. या कार्यालयात असा पहिल्यांदाच फसवणुकीचा प्रकार घडल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.अधिक माहिती अशी, कोथळी येथील आदर्श शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळाला अल्पसंख्याक दर्जा मिळण्यासाठी संस्था प्रशासनाने सर्व कागदपत्रांची फाईल धर्मादाय आयुक्त कार्यालयात दि. २२ एप्रिल २०१८ रोजी सादर केली. कार्यालयाकडून यासंबंधीचा निर्णय प्रलंबित ठेवला आहे.
दरम्यान, धर्मादाय आयुक्तालयाच्या अधीक्षकांच्या सही व शिक्क्यांच्या न्यायनिर्णय आदेशाची प्रत अल्पसंख्याक विकास विभाग, मुंबई येथे सादर केली. धर्मादाय आयुक्तालयाचा आदेश पाहून शासनाने त्याला मंजुरी दिली. त्यानंतर एका अनोळखी व्यक्तीने माहिती अधिकाराखाली संस्थेच्या मंजुरीची माहिती मागविली असता संस्थेने धर्मादाय आयुक्तालय कार्यालयाच्या अधीक्षकांची बनावट सही, शिक्क्यांचा वापर करून अल्पसंख्याक दर्जा मिळविला असल्याचे निदर्शनास आले.
कार्यालयाकडे त्यासंबंधी तक्रारही झाली. शासनाने संस्थेची अल्पसंख्याक दर्जा मंजुरी रद्द करीत धर्मादाय आयुक्त कार्यालयास गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार अधीक्षक शिवराज नाईकवडे यांनी अनोळखी व्यक्तीच्या विरोधात पोलिसांत फिर्याद दिली. या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय मोरे करीत आहेत.