कोल्हापूर : सावंत कॉलनी, शिरोली पुलाची येथील शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याचे दोषारोपपत्र सिद्ध झाल्याने जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. के. जाधव यांनी मंगळवारी तरुणास एक वर्षाची शिक्षा व २७ हजार रुपये दंड ठोठावला. आरोपी किरण सुरेश डावरे (वय २४) असे त्याचे नाव आहे.
अधिक माहिती अशी, आरोपी किरण डावरे हा सावंत कॉलनी, शिरोली पुलाची येथे राहतो. दि. ५ आॅगस्ट २०१५ रोजी शेजारी पीडित शाळकरी मुलगी शाळेला, क्लासला जाताना दुचाकीवरून तिचा पाठलाग करून हॉर्न वाजवून लक्ष वेधणे, लज्जा उत्पन होईल असे हावभाव करून इशारा करत असे.
पीडित शाळकरी मुलगी घरी एकटी असताना तिचा हात पकडला. मुलगी प्रतिसाद देत नसल्याचे पाहून तिच्या कुटुंबातील व्यक्तींची नावे चिठ्ठीत लिहून आत्महत्या करण्याची धमकी देत असे. अखेर या सर्व प्रकाराची माहिती मुलगीने आई-वडिलांना सांगितली. त्यानंतर तिच्या मावशीने शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात डावरेच्या विरोधात फिर्याद दिली. तत्कालीन तपास अधिकारी ए. एम. मुल्ला यांनी या प्रकरणी आरोपीला अटक करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले.
सरकार पक्षाने या खटल्यात नऊ साक्षीदार तपासले. पीडित मुलीची व अन्य साक्षीदारांची साक्ष महत्त्वाची ठरली. सरकारी वकील समीउल्ला एम. पाटील यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपी किरण डावरे याला बाललैंगिक अत्याचार कायद्याखाली कलम १२ प्रमाणे एक वर्षांची साधी कैद व चार कलमाखाली २७ हजार रुपये दंड ठोठावला.