कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन काम करणाऱ्या राज्य सरकारने कायद्यांचे उल्लंघन करून खासगी कंपन्यांना शाळा सुरू करण्याचा अधिकार दिला आहे. राज्य सरकारचा हा डाव हाणून पाडू, असा निर्धार विद्यार्थ्यांसह शिक्षक, नागरिकांनी शपथ घेऊन केला.कोल्हापुरात शनिवारी दसरा चौकात शिक्षण बचाव नागरी कृती समिती व कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संघटनांच्या वतीने ‘शिक्षण हक्क जागरा’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी ‘शाळा वाचवा’अशी हाक दिली.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी ‘आम्हाला मताचा अधिकार नसला तरी मत मांडण्याचा अधिकार आहे,’ असे सांगत ‘शाळा वाचली तर आपण वाचणार आहोत; त्यामुळे राज्य सरकारने घेतलेला निर्णय मागे घ्यावा,’ अशी मागणी केली. यानंतर कृती समिती व शैक्षणिक संघटनेतील प्रमुखांनी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना याबाबत मागण्यांचे निवेदन दिले.
शिक्षणाचा हक्क अबाधित राहावा यासाठी शिक्षण बचाव नागरी कृती समिती व कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संघटना आणि शाळेतील विद्यार्थ्यांनी दसरा चौकात शनिवारी शपथ घेतली. या ठिकाणी उपस्थित विद्यार्थी, विद्यार्थिनी. (छाया : आदित्य वेल्हाळ)
‘देश वाचवा, शिक्षण वाचवा’, ‘सर्वांना मोफत व गुणवत्तापूर्ण सक्तीचे शिक्षण मिळाले पाहिजे’, ‘गोरगरिबांचे शिक्षण वाचले पाहिजे’ अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी परिसर दुमदुमवून सोडला. ‘गरिबांचे शिक्षण वाचवूया..!’ अशी शपथ विद्यार्थ्यांनी यावेळी घेतली. यावेळी दसरा चौक विद्यार्थ्यांनी फुलून गेला होता.यावेळी समितीचे समन्वयक अशोक पोवार, रमेश मोरे, गिरीश फोंडे, दादा लाड, राजेश वरक, भरत रसाळे, पंडित पोवार, कोरे, सुरेश संकपाळ, दत्ता पाटील यांच्यासह वसंत मुळीक, संभाजीराव जगदाळे, सुभाष देसाई, किशोर घाटगे, सतीशचंद्र कांबळे, लाला गायकवाड, श्रीकांत भोसले, आदी उपस्थित होते.या शाळा होत्या सहभागी* एम. एल. जी., राजाराम हायस्कूल, नूतन मराठी, मुस्लिम बोर्डिंग हायस्कूल, विद्यापीठ, इंदूमती हायस्कूल, दादासाहेब मगदूम, एस. एम. लोहिया हायस्कूल, आदी
शिक्षणामुळे आपण समाजाभिमुख होतो. शिक्षणव्यवस्था मोडीत निघाली तर देश मोडेल. त्यामुळे शाळा टिकल्या पाहिजेत.- नेहा पाटील,उषाराजे हायस्कूल, कोल्हापूर.
जीवनाच्या जडणघडणीत शिक्षण महत्त्वाचे आहे. मुख्याध्यापक, शिक्षकांमुळे विद्यार्थी गुणवत्तापूर्ण व परिपक्व घडतो.- गुलनाम पठाण,छत्रपती राजाराम हायस्कूल, कोल्हापूर.
खासगी कंपन्यांच्या हातात शाळा गेल्या तर आपण कंपनीचे ‘प्रॉडक्ट’ होणार. हे थांबले पाहिजे. शाळा व शिक्षक विद्यार्थ्यांना घडवितात. शिक्षण ही आजच्या काळाची गरज आहे.- अक्षरा सौंदलगे,वाय. पी. पोवार विद्यालय, कोल्हापूर
सत्ताधारी राज्य सरकारने शिक्षणाचे बाजारीकरण करण्यास सुरुवात केली आहे. मुलांत जिद्द, मेहनत असूनही या अधिकारामुळे त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे काम सरकार करीत आहे.-स्वाती थोरात,भाई माधवराव बागल हायस्कुल.
सकारात्मक दृष्टिकोन ठेवून हा प्रश्न सोडविला पाहिजे होता. यावर चर्चा होणे गरजेचे होते; पण तसे झाले नाही.-वैष्णवी परीट,छत्रपती राजाराम हायस्कूल, कोल्हापूर.