कोल्हापूर : निराधार आजी-आजोबांना सांभाळणाऱ्या चंबुखडी येथील मातोश्री वृद्धाश्रमाला आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी ‘निखळ मैत्री परिवार’ या ग्रुपने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी सोमवारी ‘इंद्रधनु’ हा मराठी गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे.राजर्षी शाहू स्मारक भवनात सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास मातोश्री वृद्धाश्रमाचे व्यवस्थापन पाहणाऱ्या सिद्धाई महिला मंडळाच्या अध्यक्षा वैशाली राजशेखर उपस्थित असतील.
‘लोकमत’ने गुरुवार (दि. ४)च्या अंकात ‘मातोश्री वृद्धाश्रमाला हवाय मदतीचा हात’ हे वृत्त प्रसिद्ध केले. त्याची दखल घेत ‘निख्खळ मैत्री परिवार’ने या वृद्धाश्रमाला मदतीचा हात दिला आहे. त्यासाठी वृद्धाश्रमाची ओळख करून देणारी आणि मदतीचे आवाहन करणारी विशेष चित्रफीत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.या ग्रुपमध्ये ६० हून अधिक सदस्य असून ते विविध सामाजिक संस्थांना अर्थसाहाय्य करतात. दोन महिन्यांपूर्वीही त्यांनी ‘लोकमत’च्या आवाहनाला प्रतिसाद देत स्वयम् विशेष मुलांच्या शाळेला अर्थसाहाय्य केले. त्यासाठी विशेष चित्रफीत तयार करून सोशल मीडियावर टाकली होती.
त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातूनच नव्हे, तर मुंबईसारख्या शहरातूनहीअनेक व्यक्तींनी मदतीचा हात पुढे केला. तरी समाजातील दानशूर संस्था, व्यक्तींनी मदत देण्यासाठी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सामाजिक बांधीलकी जपण्याच्या उद्देशाने आमचा ग्रुप कार्यरत आहे. समाजातील दानशूरांच्या मदतीचा हात सामाजिक संस्थांपर्यंत पोहोचावा, ही त्यामागची तळमळ आहे. या उपक्रमातून एक वेगळे समाधान आम्हा सर्वांना मिळते.- सरदार पाटील, सदस्य, निखळ मैत्री परिवार.