कोल्हापूर : जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेतील ठरलेल्या सव्वा वर्षांच्या तडजोडीनुसार महिला व बालकल्याण समिती सभापतींच्या राजीनाम्याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत ठोस निर्णय झाला नसला तरीही सभापती शुभांगी शिंदे यांच्या राजीनाम्यावर आज, मंगळवारी शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्यानंतरच या पदावर आवाडे गटाच्या वंदना मगदूम यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.दोन महिन्यांपासून जिल्हा परिषदेतील अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच चार विषय समित्यांच्या पदांच्या बदलाबाबत चर्चा सुरू आहे; पण गटनेत्यांमध्येएकमत होत नसल्याने सव्वा वर्षाचा पदाधिकारी बदलाचा ‘फॉर्म्युला’ लांबणीवर पडला.
यापूर्वी भाजपकडे असणारे अध्यक्षपद बदलले जाणार नसल्याचे यापूर्वीच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले, पण इतर पदाधिकारी बदलासाठी भाजपचा पूर्णपणे पाठिंंबा राहील, असेही जाहीर केले आहे. त्यामुळे सत्तेतील इतर घटक पक्षांच्या नेत्यांकडूनही पदाधिकारी बदलासाठी चालढकल केली जात आहे.पण स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आवाडे गटाच्या ठरलेल्या सव्वा वर्षांच्या तडजोडीनुसार महिला व बालकल्याण समिती सभापती बदलाच्या हालचाली वेगवान झाल्या आहेत.
त्याबाबत सोमवारी सायंकाळी जिल्हा परिषदेमध्ये महिला व बालकल्याण समिती सभापती शुभांगी शिंदे, ‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांच्यासह ‘स्वाभिमानी’च्या इतर प्रमुख नेत्यांची बैठक झाली; पण त्या बैठकीत कोणताच निर्णय झाला नाही, पण निर्णय आज, मंगळवारी होण्याची शक्यता असून त्यानंतरच सभापती शिंदे आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.अध्यक्षसह इतर पदे अडीच वर्षेभाजपकडे असणारे जिल्हा परिषद अध्यक्षपदासह शिवसेनेकडील उपाध्यक्ष व शिक्षण-अर्थ सभापतिपद तसेच ‘जनसुराज्य’कडील बांधकाम व समाजकल्याण समिती सभापती ही पदे अडीच वर्षे कायम राहण्याची शक्यता आहे.