कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती व उपसभापती बदलाच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. वर्षाची मुदत संपत आल्याने इच्छुकांनी नेत्यांकरवी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. नेत्यांमधील ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार ज्येष्ठ संचालक दशरथ माने यांचे नाव आघाडीवर आहे.
समितीच्या २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्टवादी कॉँग्रेस, जनसुराज्य, शेकाप व आमदार सतेज पाटील आघाडीची सत्ता आली. नेत्यांमध्ये झालेल्या समझोत्यानुसार सभापतिपद पहिल्या वर्षी ‘जनसुराज्य’ला, दुसऱ्या व तिसºया वर्षी राष्टÑवादीकडे, चौथ्या वर्षी सतेज पाटील गटाकडे; तर पाचव्या वर्षी जनसुराज्य पक्षाकडे जाणार आहे. त्यानुसार आतापर्यंत परशराम खुडे, सर्जेराव पाटील-गवशीकर, कृष्णात पाटील यांना संधी मिळाली आहे. विद्यमान सभापती कृष्णात पाटील यांचा वर्षाचा कालावधी २४ आॅक्टोबर रोजी संपत असल्याने हालचाली गतिमान झाल्या आहेत.
आमदार पाटील गटाचे विलास साठे व दशरथ माने हे दोन संचालक आहेत. साठे यांना पहिल्यांदा उपसभापती पदाची संधी दिल्याने सभापती पदासाठी माने दावेदार ठरतात. ‘शेकाप’चे उपसभापती अमित कांबळे यांची मुदत ९ नोव्हेंबरला संपत असली तरी एकाच वेळी दोन्ही निवडी घेण्याच्या सूचना नेत्यांच्या आहेत. एकदम निवडी झाल्या तर उपसभापतिपदासाठी इच्छुकांची संख्या वाढणार आहे. राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या गटाच्या रंजना नानासाहेब पाटील, माजी मंत्री विनय कोरे यांच्या गटाच्या शारदा सरदार पाटील व मानसिंगराव गायकवाड यांचे समर्थक शेखर येडगे हे दावा करू शकतात. आगामी विधानसभा पाहता, रंजना पाटील या बाजी मारण्याची दाट शक्यता आहे.सभापती निवडीला विधानसभेची झालर!आगामी वर्षभरात लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्या पार्श्वभूमीवर आघाडीतील नेत्यांचा सत्तेची पदे आपल्याच हातात ठेवण्याचा प्रयत्न राहणार आहे. त्यातूनच चौथ्या वर्षी जनसुराज्य पक्ष सभापतिपदावर दावा सांगण्याची शक्यता आहे. विधानसभेच्या दृष्टीने शाहूवाडी भक्कम करण्यासाठी माजी मंत्री विनय कोरे यांनी यापूर्वीच सर्जेराव पाटील-पेरीडकर यांना बांधकाम सभापतिपद दिले आहे. आता बाजार समिती सभापतिपदाची लाड यांच्या रूपाने दुसरी संधी देऊन कोरे हे शाहूवाडीकरांची सहानुभूती मिळविण्याची खेळी करण्याची शक्यता आहे.