कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेतील सात नगरसेवकांचे पद रद्द झाल्याच्या चर्चेने महापौर - उपमहापौर निवडणुकीच्या हालचाली अतिशय गतीमान झाल्या आहेत. नगरसेवकपद रद्द झालेल्यांमध्ये सत्तारुढ कॉँग्रेस - राष्ट्रवादीच्या सहा तर विरोधी भाजप -ताराराणी आघाडीच्या एकाचा समावेश आहे.
काहीही करुन महापौर - उपमहापौरपदाची निवडणूक जिंकायचीच या इराद्याने सात नगरसेवकांची पदे रद्द करण्याच्या प्रक्रियेत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा हात असल्याची चर्चामहापालिका वर्तुळात आहे. दरम्यान, महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी चर्चेच्या अनुषंगाने कोणताही आदेश आपल्याकडे प्राप्त झाल्याचे स्पष्ट केले.कोल्हापूर महानगरपालिकेची महापौर - उपमहापौरपदाची निवडणुक सोमवारी होत आहे. ८१ जणांच्या सभागृहात कॉँग्रेस राष्ट्रवादी आघाडीकडे ४४ नगरसेवक आहेत तर विरोधी भाजप ताराराणी आघाडीकडे ३३ नगरसेवक आहेत.
शिवसेनेचे चार नगरसेवक असून त्यांनी कॉँग्रे आघाडीला पाठींबा दिला आहे. मात्र जात पडताळणीचे प्रमाणपत्र निर्धारित मुदतीत न दिल्याच्या कारणावरुन दीपा कदम, संदीप नेजदार, वृषाली कदम, सचिन पाटील आणि संतोष गायकवाड या पाच नगरसेवकांचे पद रद्द केल्याची तर अफजल पिरजादे आणि अनिल चव्हाण या दोघांचे नगरसेवकपद हे पक्षांतर बंदी कायद्यानुसार रद्द केल्याची चर्चा सकाळपासून शहरात पसरली आणि एकच खळबळ उडाली.
सत्तारुढ गटाच्या काही प्रमुख नगरसेवकांनी महापालिकेत धाव घेत आयुक्त डॉ. चौधरी यांच्याकडे चौकशी केली. तर त्यांनी त्याचा इन्कार केला. जरी राज्य सरकारने तसा निर्णय घेतला तरी भाजप - ताराराणी आघाडीला महापौर - उपमहापौर करण्यास संख्याबळ कमीच पडते.
मात्र त्यांनी शिवसेनेच्या चार नगरसेवकांसह कॉँग्रेस - राष्ट्रवादीतील नाराजांवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यात मोठी सौदेबाजी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.