कोल्हापूर : शिवाजी स्टेडियम येथील जलतरण तलावाची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे हा तलाव मरणासन्न अवस्थेत आहे. त्याची त्वरित दुरुस्ती करून तो खुला करावा, या मागणीसाठी बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समितीतर्फे गुरुवारी जिल्हा क्रीडा कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर दुरुस्तीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास पाठविण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
शिवाजी स्टेडियम येथे २६ वर्षांपूर्वी सर्वसामान्य जलतरणपटूंना अल्प शुल्कात पोहण्याचा सराव करता यावा, याकरिता या जलतरण तलावाची निर्मिती झाली. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून क्रीडा कार्यालयाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे तलावातील फिल्टरेशन सुविधा निकामी झाली आहे; तर स्त्री, पुरुष बाथरूमधील फरशाही फुटल्या आहेत. तलावात प्रवेश करण्यासाठी दरवाजेही खराब झाले आहेत. गॅलरीचे पत्र्याचे शेडही गायब झाले आहे. तलावातील ग्लेज्ड फरशाही फुटल्या आहेत. त्यामुळे हा तलाव पोहण्याचा सराव करण्यास निरुपयोगी ठरला आहे. त्यामुळे तो त्वरित दुरुस्त करून जलतरणपटूंना खुला करावा, या मागणीसाठी बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समितीने गुरुवारी दुपारी जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांना घेरावो घातला.
मात्र, जिल्हा क्रीडाधिकारी चंद्रशेखर साखरे हे आजारी असल्याने उपस्थित नव्हते. त्यामुळे तासभर कार्यालयात घेरावो घातल्यानंतर आंदोलकांनी कार्यालयाला कुलूप घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करीत आंदोलनकर्त्यांचे निवेदन क्रीडाधिकारी सुधाकर जमादार यांना स्वीकारण्यास सांगितले. त्यावर आंदोलकांनी तलावदुरुस्तीचे लेखी आश्वासन दिल्याशिवाय आंदोलन स्थगित केले जाणार नाही, असा इशारा दिला. त्यावर चर्चेअंर्ती क्रीडाधिकारी जमादार यांनी दुरुस्तीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास पाठविण्याचे लेखी आश्वासन दिले. आंदोलकांनी दीड तासानंतर हे आंदोलन स्थगित केले.
यावेळी समितीचे संस्थापक किसनराव कल्याणकर, अध्यक्ष रामेश्वर पतकी, कार्याध्यक्ष जयकुमार शिंदे, राहुल चौधरी, चिन्मय सासने, गुरुदत्त म्हाडगुत, श्रीधर कुलकर्णी, अंकुश देशपांडे, प्रशांत बरगे, विकास शिरगावे, युवराव देवणे, प्रताप जाधव, महावीर भंडारी, महेश जोशी, रामचंद्र मोहिते, पंडित ठोमके, आदी उपस्थित होते.