कोल्हापूर : प्रचलित नियमानुसार अनुदान आणि अघोषित शाळांना निधी देण्याचे आश्वासन राज्य सरकारने पूर्ण केलेले नाही; त्यामुळे सरकारच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समितीतर्फे सोमवार (दि. १९) पासून धरणे आंदोलन केले जाणार आहे. मुंबईतील आझाद मैदानावर हे आंदोलन होणार आहे, अशी माहिती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी दिली.नागपूरमधील पावसाळी अधिवेशनामध्ये २० जुलै २०१८ रोजी मुख्यमंत्र्यांनी २० टक्के अनुदानपात्र शाळांना प्रचलित नियमानुसार अनुदान देण्याबाबत आणि अघोषित सर्व शाळा निधीसह घोषित करण्याबाबत निर्णय लवकरच घेऊ, असे आश्वासन दिले होते. हे आश्वासन शासनाने पाळावे आणि हजारो शिक्षकांची वेठबिगारी थांबवावी, अशी अपेक्षा होती; परंतु, या आश्वासनाची पूर्तता झाली नसल्याने मुंबईत धरणे आंदोलन केले जाणार आहे.
या आंदोलनामध्ये राज्यातील एकूण ६ हजार ५०० माध्यमिक, प्राथमिक विनाअनुदानित शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. मागण्यांच्या पूर्ततेबाबत जोपर्यंत सरकार सकारात्मक कार्यवाही करीत नाही, तोपर्यंत धरणे आंदोलन सुरू राहणार आहे, असे जगदाळे यांनी सांगितले.