कोल्हापूर : पाण्याबरोबरच उसाच्या टंचाईमुळे हंगाम लांबला तर कारखान्यांसमोर अडचणी निर्माण होतील. त्यामुळे सरकारच्या पातळीवर मदतीसाठी प्रयत्न करूया, पण शनिवार(दि. १०)पासून हंगाम सुरू करायचा, अशा हालचाली साखर कारखानदारांच्या पातळीवर सुरू झाल्या आहेत. कागल येथे जिल्ह्यातील कारखान्यांच्या शेती अधिकाऱ्यांची बैठक घेऊन यामध्ये हंगामाची चाचपणी करण्यात आली.ऊसदराच्या प्रश्नांवरून साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाची कोंडी निर्माण झाली आहे. रविवारी कारखानदारांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन एफआरपी देण्यासाठी मदत करण्याची मागणी केली होती. त्यावर ‘मदत करू पण हंगाम सुरू करा’, अशी सूचना मंत्री पाटील यांनी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी कारखान्यांच्या शेती अधिकाऱ्यांची बैठक कागलमध्ये घेण्यात आली. त्यामध्ये कारखानानिहाय आढावा घेण्यात आला.
‘एफआरपी’ देण्यासाठी पैसे उपलब्ध होत नाहीत, ही जरी वस्तुस्थिती असली तरी हंगाम लांबला तर कारखान्यांसमोर त्यापेक्षाही मोठे संकट निर्माण होणार आहे. त्यामुळे दिवाळीचे चार दिवस थांबूया, पण शनिवारपासून हंगाम सुरू करावाच लागेल, अशी भूमिका बहुतांशी अधिकाऱ्यांनी मांडली.
ऊसतोडणी मजुुरांच्या पोटाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांचे हात थांबल्याने त्यांना खावटी कर्ज उपलब्ध करून द्यावे लागणार असल्याने तो पेच आहे. त्यामुळे सरकारच्या पातळीवर मदतीसाठी प्रयत्न सुरू ठेवायचा पण कारखाने शनिवारपासून सुरू करावेत यावर एकमत झाल्याचे समजते.शुक्रवारी ‘भाऊबीज’ आहे, शनिवारी हंगाम सुरू करायचा म्हटले तरी मराठवाड्यातील ऊसतोड मजूर शनिवारचा मुहूर्त करत नसल्याचे अनेक कारखाना अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे शुक्रवारी दुपारीच तोडण्या देऊन शनिवारपासून हंगाम सुरू होऊ शकतो.
जिल्ह्यात १२० लाख टन ऊस उपलब्धकृषी अधिकाऱ्यांच्या बैठकीत जिल्ह्यातील उसाच्या उपलब्धतेचा आढावा घेण्यात आला. यंदा १२० लाख टन ऊस उभा असल्याने कारखाने पूर्ण क्षमतेने चालणार का? हा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे अधिकाऱ्यांनी सूचित केल्याचे समजते.