कोल्हापूर : उडान-३ अंतर्गत कोल्हापूर ते मुंबई विमानसेवा सुरू करण्यासाठी दोन कंपन्यांना केंद्र सरकारने परवानगी दिली. त्यामुळे या हवाईमार्गावर लवकरच सेवेला लवकरच प्रारंभ होणार आहे. घोडावत एव्हिएशन आणि ट्रूजेट या त्या दोन कंपन्या आहेत.कोल्हापूर विमानतळाच्या विकासासाठी २७० कोटी रुपये मंजूर झाले असून, त्या अंतर्गत सर्व महत्त्वाची कामे सुरू झाली आहेत. वर्षभरात धावपट्टी, ए. टी. सी. टॉवर, विद्युतीकरण यांसह इतर कामे पूर्ण होणार आहेत. सध्या विमानतळावरून डे आॅपरेशन्स सुरू आहेत. कोल्हापूर-मुंबई, कोल्हापूर-हैदराबाद आणि कोल्हापूर-बंगलोर या हवाईमार्गावर सेवा सुरू करण्याला उडान योजनेच्या पहिल्या दोन टप्प्यांत मंजुरी मिळाली होती; पण डेक्कन चार्टर कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे कोल्हापूर-मुंबई मार्गावरील सेवा खंडित झाली. या पार्श्वभूमीवर खासदार धनंजय महडिक यांनी या कंपनीला ‘ब्लॅकलिस्ट’ करून ‘उडान फेज ३’ अंतर्गत दुसऱ्या सक्षम हवाई कंपनीला या मार्गावर उड्डाण करण्यास परवानगी देण्याची मागणी केली होती. त्याला नागरी उड्डाणमंत्री सुरेश प्रभू यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. ‘उडान फेज ३’ अंतर्गत हवाईमार्गांची निश्चिती करताना त्यामध्ये कोल्हापूर-मुंबई या मार्गाचा प्रामुख्याने समावेश केला आहे. ट्रू जेट आणि घोडावत एव्हिएशन या दोन कंपन्यांना कोल्हापूर-मुंबई या हवाईमार्गावर विमान वाहतूक करण्याला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्याचबरोबर घोडावत एव्हिएशनलाही परवानगी मिळाल्याने नजीकच्या काळात कोल्हापूर-मुंबई हवाई सेवा सुरळीतपणे सुरू राहील, हे निश्चित झाले आहे. लवकरच दोन्ही कंपन्यांची विमानसेवा सुरू होईल, अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली आहे. कोल्हापूरहून हैदराबाद आणि बंगलोरसाठी अलायन्स एअर या कंपनीची विमाने दररोज उड्डाण घेत असून, त्याला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.-----------ट्रुजेट कंपनीची १४ मार्गावर सेवाट्रु जेट ही टर्बो मेगा एअरवेज या हैदराबादस्थित हवाई कंपनीची सेवा आहे. सध्या या कंपनीमार्फत १४ मार्गांवर सेवा सुरू आहे. कोल्हापूर विमानसेवा सुरू करताना ती कोल्हापूर-मुंबई-जळगाव-मुंबई-कोल्हापूर असून ती ७२ सीटर असेल. कोल्हापुरातून मुंबईकडे उड्डाण होण्यासाठी सकाळची वेळ मिळण्यासाठी खासदार महाडिक प्रयत्न करीत आहेत.उडान-३ साठी ५०० कोटींची तरतूद : सुरेश प्रभूउडान ३ योजनेअंतर्गत ५०० कोटींची तरतूद करण्यात आली असून, ८ फेबु्रवारीला उडान-३ हा कार्यक्रम होणार आहे. या योजनेत कोल्हापूर, चिपी (सिंधुदुर्ग) रत्नागिरीसह देशातील काही विमानतळांचा समावेश असल्याची माहिती केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांनी सावंतवाडी येथे केली. तसेच लवकरच सिंधुदुर्गच्या समुद्रात सी-प्लेन उतरणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
कोल्हापूर-मुंबई विमानसेवा लवकरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 1:04 AM