कोल्हापूर : ‘उडान ’योजनेच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत सुरू झालेली कोल्हापूर-मुंबई विमानसेवा बंद झाली आहे. ही सेवा नियमितपणे देण्यास अपयशी ठरलेल्या एअर डेक्कन कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. ‘उडान ’च्या दुसऱ्या टप्प्यामधील हैदराबाद-कोल्हापूर-बंगलोर विमानसेवा अलायंस एअर कंपनीच्या माध्यमातून दि. १ नोव्हेंबरपासून सुरू होईल. त्यासाठीची चाचणी सहा दिवसांत होईल, असे खासदार धनंजय महाडिक यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.गेल्या सहा महिन्यांपूर्वी एअर डेक्कनच्या माध्यमातून कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरू झाली. आठवड्यातून तीन दिवस विमानसेवा पुरविण्यात येत होती. या सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद राहिला; मात्र, कंपनीकडून सुरुवातीच्या दीड महिन्यानंतर सेवा देण्यात खंड पडला.
त्यावर या कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे केली असता, पुन्हा या कंपनीकडून सेवा सुरू झाली; मात्र, गेल्या वीस दिवसांपासून कोल्हापूर-मुंबई विमानसेवा बंद आहे. या एअर डेक्कन कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी पुन्हा केंद्र सरकारकडे करणार आहे. अलायंस एअर कंपनीच्या माध्यमातून हैदराबाद-कोल्हापूर-बंगलोर अशी विमानसेवा सुरू होणार असल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले.
कोल्हापूर-तिरूपतीसेवा डिसेंबरमध्ये‘उडान’च्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत अलायन्स एअरच्या माध्यमातून कोल्हापूर-मुंबई सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यासह कोल्हापूर-तिरूपती विमानसेवा साधारणत: १५ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. ही सेवा इंडिगो कंपनी पुरविणार असल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले.