कोल्हापूर : कोल्हापूरसह राज्यातील २७ महापालिकांच्या महापौरपदांची आरक्षण सोडत बुधवारी मुंबईत काढण्यात आली. यात विविध प्रवर्गातील राज्यभरातील महापौरपदांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले. कोल्हापूर महानगरपालिकेचे महापौरपदही पुढील अडीच वर्षांसाठी महिलांच्या नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित झालेले आहे.
त्यामुळे पुन्हा एकदा कोल्हापूर महानगरपालिकेत महिलांचे राज्य येणार आहे. कोल्हापूरात २0१0 पासून आतापर्यंत महापौरपद हे महिलांसाठीच आरक्षित झालेले आहे.कोल्हापूरसह नांदेड, सोलापूर, मालेगाव या महानगरपालिकेत महिलांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाले असून नवी मुंबई, जळगाव, भिवंडी, अकोला, पनवेल, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद आणि चंद्रपूर येथील महापौर या खुल्या प्रवर्गातील महिला असतील.
मुंबईसह पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, कल्याण डोंबिवली, सांगली आणि उल्हासनगर या महापालिकांमध्ये खुल्या प्रवर्गातील पुरुषांसाठी महापौरपदाचे आरक्षण जाहीर झाले आहे.कोल्हापूर महापालिकेचे महापौरपद पुढील अडीच वर्षासाठी महिलांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. कोल्हापूरचे महापौरपद २0१0 पासून सलग महिलांसाठी आरक्षित असल्याने नव्या सोडतीत महापौरपद पुरुष प्रवर्गासाठी आरक्षित होईल, अशी अपेक्षा धरलेल्या सदस्यांच्या पदरी मात्र निराशा पडली आहे.