कोल्हापूर : जुन्या योजनांच्या पूर्ततेला प्राधान्य देणारे, नागरिकांच्या सूचनांचा आंतर्भाव असणारे, चांगल्या सुविधा देणारे, शहर स्वच्छतेला प्राधान्य देणारे तसेच महापालिकेच्या उत्पन्नवाढीला प्राधान्य देणारे, पंचगंगा नदी प्रदुषण रोखण्यावर भर देणारे कोल्हापूर महानगरपालिकेचे सन २०२४-२०२५ सालाचे नवीन अंदापत्रक मंगळवारी प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी जाहीर केले. या अंदाजपत्रकात घरफाळा, पाणीपट्टीमध्ये कसलीही वाढ करण्यात आली नसली तरी महापालिकेची मैदाने, दुकानगाळ्यांचे हस्तांतर, फिजिओथेरपी सेंटरच्या शुल्कात किंचित वाढ करण्यात आली आहे.
महापालिकेच्या अर्थसंकल्पीय अंदाजात अव्वल शिल्लकेसह महसूली व भांडवली अपेक्षित जमा रक्कम ८६८.०६ कोटी असून खर्च ८६७.८४ कोटी अपेक्षित आहे. विशेष प्रकल्पा अंतर्गत जमा ३४६.५१ कोटी अपेक्षित असून खर्च ३४४.३८ कोटी अपेक्षित आहे. वित्त आयोगाअंतर्गत एकूण ४६.५४ कोटी अपेक्षित असून खर्च ४६.०६ कोटी अपेक्षित आहे. तर एकत्रित महसुली, भांडवली व विशेष प्रकल्प, वित्त आयोग असे मिळून एकूण १२६१.११ कोटी इतके जमेचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक आहे.
सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षात राज्य तसेच केंद्र सरकारकडून प्राप्त झालेल्या निधीतून केल्या जाणाऱ्या विकास कामांची पूर्तता करण्याचा संकल्प नवीन अंदाजपत्रकात करण्यात आला आहे. त्यामध्ये महालक्ष्मी विकास आराखडा, रंकाळा तलाव सुशोभिकरण, नगरोत्थानमधील रस्ते, सरस्वती चत्रमंदिर, स्टेशनरोड येथील बहुमजली पार्कींग, अमृत योजना -२ मधील मलनिस्सारण व तलाव संवंर्धन,शाहू समाधीस्थळ विकास, सार्वजनिक शौचायल, पंचगंगा नदी प्रदुषण रोखणे या विकास कामांचा समावेश आहे.
नागरिक व पर्यटकांच्या सोयीसाठी सार्वजनिक टॉयलेट शोध ॲप, सर्व विभागात ऑनलाईन पैसे स्वीकारण्याची सुविधा, एमपीएससी परीक्षार्थींसाठी मुलाखतीचे प्रशिक्षण वर्ग सुरु करणे, सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता ४३ एमएलडी पर्यंत वाढविणे, ग्रीनपीस विकसीत करणे, कचरा प्रकल्पावर बफरझोन निर्माण करणे, शहरातील कचरा उचलण्यासाठी ४० ॲटोटिपर रिक्षा, १२ ट्रॅक्टर ट्रॉलीज, बारा स्वीपींग मशिन खरेदी अशा नवीन कामांचा समावेश या अंदाजपत्रकात करण्यात आला आहे.