कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक पुन्हा लांबणीवर पडली आहे. निवडणूक आयोगाच्या शिफारशीनुसार राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोल्हापूर महापालिकेची निवडणूक नोव्हेंबर महिन्यापर्यंत लांबण्याची शक्यता आहे.कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक लांबणीवर टाकण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. मार्चमधील संभाव्य निवडणूक आता नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. प्रशासक म्हणून कादंबरी बलकवडे यांच्याकडेच पालिकेचा कार्यभार राहणार आहे. त्यामुळे इच्छुकांचा दुसऱ्यांदा हिरमोड झाला आहे.कोल्हापूर महापालिकेमध्ये सध्या काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. आघाडीला शिवसेनेचीही साथ आहे. त्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. त्यामुळे यंदाही कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत हे तिन्ही पक्ष एकत्र येतात का महत्त्वाचं ठरणार आहे. गेल्यावेळी भाजपने स्थानिक ताराराणी आघाडीशी युती करून सत्तेच्या जवळपास यश मिळवलं. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेच्या चार सदस्यांना सोबत घेतल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीने सत्ता मिळवली.गेल्यावेळी भाजप सत्तेत होता त्याचा परिणाम महानगरपालिका निवडणुकीतील यशावर झाला. ताराराणी आघाडीचे प्रमुख महाडिक कुटुंबीय आता भाजपमध्ये आहेत. त्यामुळे ही निवडणूक भाजपच्या चिन्हावर लढवली जाणार की ताराराणी आघाडी आणि भाजप अशी युती होणार हे महत्त्वाचं आहे. जिल्ह्यात दोन्ही खासदार शिवसेनेचे, मात्र ...कोल्हापूर जिल्ह्यात दोन खासदार आहेत. हे दोन्ही खासदार शिवसेनेचे आहेत. मात्र २०१९ च्या विधानसभा निकालात कोल्हापूर जिल्ह्यात प्रचंड उलटफेर पाहायला मिळाले. शिवसेनेने ६ पैकी ५ जागा गमावल्या. तर कोल्हापूर जिल्हा भाजपमुक्त झाला.पक्षीय बलाबल
- काँग्रेस- ३०
- राष्ट्रवादी- १५
- शिवसेना- ०४
- ताराराणी आघाडी- १९
- भाजप- १३
- एकूण जागा -८१